मुंबई - सर्वसामान्य नागरिक अतिरिक्त वीज बिलाने त्रासला आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे काम नाही, कंपन्या बंद होत आहेत. त्यामुळे अनेकजण घर कसे चालवायचे या विवंचनेत आहेत. अशा परिस्थितीत सामान्य जनतेला वीज बिलात दिलासा देण्याऐवजी मंत्र्यांना वीज बिलात सवलत देणे म्हणजे सर्वसामान्य गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. हे सरकार मोठ्या लोकांची पाठराखण करत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी 'एनडीएमधून बाहेर पडणे ही शिवसेनेची मजबुरी होती', असे व्यक्तव्य केले होते. या व्यक्तव्याचा दरेकर यांनी समाचार घेतला. २५ ते ३० वर्षे शिवसेना व भाजपासोबत युतीकरून राजकारण सुरू होते. ही त्यांची मजबुरी होती का? असा प्रश्न त्यांनी शिवसेनेला विचारला आहे. हिंदुत्व व राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर भाजपाबरोबर शिवसेना का होती? याचे उत्तर संजय राऊत यांना द्यावे लागेल, असे दरेकर म्हणाले.