मुंबई - मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणी ( Mumbai Bank Case ) भाजप नेते प्रवीण दरेकर ( Pravin Darekar ) सोमवारी (दि. 28 मार्च) अटकपूर्व जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने ( Mumbai Session Court ) दरेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर दरेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी (दि. 29 मार्च) सुनावणी होण्याची शक्यता आहे.
प्रवीण दरेकर यांनी यापूर्वीही मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना कुठलाही दिलासा न देता खालच्या न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर प्रवीण दरेकर यांनी मुंबई सत्र न्यायालयात ( Mumbai Session Court ) अर्ज दाखल केला होता. सत्र न्यायालयानेही दरेकर यांना कुठलाही दिलासा दिला नाही. त्यानंतर पुन्हा दरेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून या अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती अॅड. अखिलेश चौबे यांनी दिली.
काय आहे प्रकरण..? - 2017 च्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये काम केल्याबद्दल दरेकर यांनी 25 हजार 700 रुपयांची मजूरी घेतल्याची नोंद आहे. डिसेंबर, 2017 मध्ये नागपूर अधिवेश सुरू असताना मजूर म्हणून काम केल्याचा परतावा कसा घेतला ? मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी असताना दरेकर यांनी अनेक घोटाळे केले असल्याचे आरोप करण्यात आले ( Mumbai Bank Case ) होते. प्रवीण दरेकर हे बँकेच्या संचालक मंडळावर निवडून गेले होते. मात्र, त्यांनी मजूर या प्रवर्गातून अर्ज दाखल केला होता. प्रवीण दरेकर यांनी बोगस पद्धतीने मजूर म्हणून नोंदणी केली असल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी आता चौकशी सुरू आहे. त्यामुळे दरेकरांच्या अडचणी वाढल्या आहेत.
आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांनी प्रथम कोर्टात याचिका दाखल केली होती की,कोट्यधीश असणारे दरेकर मुंबई बँकेत मजूर संचालक म्हणून कसे निवडूण आले. त्यानंतर खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याचे न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केले आहे. काही वर्षांपूर्वी मजूरी करणाऱ्या दरेकरांकडे कोट्यवधींची मालमत्ता कशी आली? याचीही चौकशी होणे गरजेचे असल्याचे विशेष सरकारी वकीलांनी मागणी केली होती. तसेच राज्य सरकारने प्रवीण दरेकरांच्या याचिकेला जोरदार विरोध करत फसवणुकीच्या या प्रकरणात त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्याची गरज असल्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर दरेकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा - Mumbai High Court : घटस्फोटित आईची जात मुलांना लावता येईल - मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय