मुंबई - मुंबई महानगरपालिकेत अनेक घोटाळे झाले, शहरात दुर्घटनाही होतात. त्यात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. मात्र, जे अधिकारी निर्दोष असतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार नाही, असे नवनियुक्त पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी स्पष्ट केले. भ्रष्ट ठेकेदारांना पालिकेतून हद्दपार करणेच योग्य ठरेल, असेही कारवाईचे सूचक वक्तव्य परदेशी यांनी यावेळी केले.
मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार प्रवीण परदेशी यांनी अजोय मेहता यांच्याकडून आज स्वीकारला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुंबईत नुकताच सीएसएमटी जवळील पुलाचा अपघात झाला. त्याप्रकरणी पालिकेच्या तीन अभियंत्यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत अभियंता संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यावर बोलताना घोटाळे किंवा दुर्घटना झाल्यावर चुकीचे काम करणाऱ्या किंवा कामात दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर किंवा कर्मचाऱ्यांवर वचक राहिला पाहिजे. म्हणून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. मात्र, अशी कारवाई करताना निर्दोष अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ नये, याची दखल घेतली जाईल, असे परदेशी यांनी स्पष्ट केले.
ठेकेदार हद्दपार झालाच पाहिजे
नालेसफाईतील घोळ समोर आल्यावर ठेकेदारांवर कारवाई झाली. अनेक ठेकेदारांना पालिकेने काळ्या यादीत टाकले. मात्र, नाव बदलून ठेकेदार पुन्हा शिरकाव करतात. अशांवर जरब बसविण्यासाठी कठोर कारवाई व्हायला हवी. केवळ नालेसफाईतच नव्हे तर प्रत्येक खात्यात बनवाबनवी करणारे ठेकेदार हद्दपार झालेच पाहिजेत, अशी ठाम भूमिका परदेशी यांनी मांडली.