मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डॉक्टर डी. वाय. पाटील विद्यापीठाने डि.लीट ही मानद पदवी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सेवाभावी कार्याला अनुसरून त्यांनाही डि लीट पदवी देण्यात आली आहे. याबाबत खासदार संजय राऊत यांनी आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी लीट कशासाठी दिली? अशी डी लिट देणाऱ्या विद्यापिठाची चौकशी करा, अशी मागणी राऊत यांनी केली होती. शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना अजब विधान केले आहे.
राउतांच्या तोंडाचे ऑपरेशन करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांना डिलीट अर्थात डॉक्टरेट ऑफ लिटरेचर ही पदवी मिळाल्यानंतर ते आता वैद्यकीय डॉक्टर झाल्याचा भ्रम त्यांच्या पक्षाचे प्रतोद भरत गोगावले यांना झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता सर्वात आधी सतत काहीतरी बरळणाऱ्या संजय राऊत यांच्या तोंडाचे ऑपरेशन करावे, अशी प्रतिक्रिया गोगावले यांनी व्यक्त केली आहे.
शिफारसी वरून पदवी नाही : या संदर्भात पुढे बोलताना भरत गोगावले म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कारकीर्दीत केलेला सेवाभावी कामांची दखल घेत सदर विद्यापीठाने त्यांना ही पदवी दिली आहे. या पदवीसाठी मुख्यमंत्र्यांनी पैसे दिले नाहीत. किंवा त्यांच्या नावाची कुणीही शिफारस केली नाही. त्यांचे काम पाहून जर विद्यापीठाला वाटले असेल त्यांना पदवी द्यावी तर. संजय राऊत यांच्या पोटात दुखण्याची गरज काय? संजय राऊत यांना प्रत्येक गोष्टीत काहीतरी वाकडेच दृष्टीस पडते. परंतु विद्यापीठाने केलेला हा मुख्यमंत्र्यांचा सन्मान योग्यच आहे असा दावा गोगावले यांनी केला.
सावरकर गौरव यात्रा काढणारच : पक्षाच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातील अनेक प्रसंगांवर आधारित माहिती जनतेला व्हावी यासाठी सावरकर गौरव यात्रा राज्यभरात काढणार आहे. त्याची तयारी सध्या जोरदार सुरू असल्याची माहिती ही आमदार भरत गोगावले यांनी दिली.