मुंबई - राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षणात कोणत्याही इतर समाजाच्या नेत्यांनी ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करू नये. तसेच, ओबीसीमध्ये आरक्षण मागण्याचा प्रयत्नही करू नये. अन्यथा ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल, असा निर्वाणीचा इशारा धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी आज 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिला.
मराठा समाजातील अनेक नेत्यांकडून ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी लावून धरली जात आहे. त्या विरोधात राज्यातील ओबीसींमधून संताप व्यक्त केला जात आहे. मराठा समाजाने ओबीसीमध्ये आरक्षण मागू नये, याच मागणीसाठी आज 'ओबीसी आरक्षण बचाव' या नावाने महाराष्ट्र राज्य समता परिषदेकडून मुंबईत मोर्चा काढण्यात आला. यासोबतच राज्यभरातील विविध ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ओबीसी आरक्षणामध्ये मराठा समाजाने कोणतीही मागणी करू नये, अशी मागणी करण्यात आली.
राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
राज्यात 8 डिसेंबर रोजी मराठा क्रांती मोर्चाकडून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनातील अनेक नेत्यांनी मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे. या आंदोलनामुळे राज्यात ओबीसी आणि मराठा समाजात दुफळी निर्माण होऊ शकते. त्यामुळे, सरकारने या आंदोलनाला राज्यात कुठेही परवानगी देऊ नये, अशी मागणी शेंडगे यांनी केली. तसेच, या आंदोलनाच्या विरोधात आम्ही 5 डिसेंबरला औरंगाबाद येथे एक परिषद आयोजीली असून, यात मराठा आंदोलनाविरोधातील रूपरेशा आम्ही ठरवणार असल्याचेही शेंडगे म्हणाले.
हेही वाचा - अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या हाती शिवबंधन; कोणती जबाबदारी मिळणार याकडे लक्ष