मुंबई - राजा ढाले यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे, तर विविध क्षेत्रांतून त्यांच्या जाण्याने शोक व्यक्त केला जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही ढालेंच्या जाण्याने शोक व्यक्त केला आहे.
राजा ढाले हे आज आपल्यातून निघून गेले आहेत हे फार दुःखदायक आहे. चळवळीतील जाणकार, विचार करणारे नेतृत्व असे ढाले होते. सत्तरच्या दशकामध्ये ही चळवळ त्यांनी आपल्या खांद्यावर चालवली, दिशा दिली. ते चळवळीचे मार्गदर्शक होते, भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष होते. त्यांच्या जाण्याने समस्त आंबेडकरी चळवळीला दुःख झाले आहे. ही पोकळी कधीच भरून निघणार नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी ढाले यांच्या निधनानंतर म्हटले आहे.
दलित पँथरचे संस्थापक, आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, ज्येष्ठ विचारवंत, नेते राजा ढाले यांचे सोमवारी सकाळी विक्रोळी येथील निवासस्थानी निधन झाले. ढाले यांच्या निधनाची वार्ता कळताच आंबेडकरी जनतेकडून तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री फडणवीस, अविनाश महातेकर, रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर यांच्याकडूनही पॅंथरचे झंझावत शांत झाले, अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.