मुंबई - कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम आत्मसमर्पण करणार होता. याची माहिती प्रसिद्ध वकील राम जेठमलानी यांनी शरद पवारांना दिली होती. पण, पवारांनी याची माहिती दडवली असा आरोप अॅड. प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही याची माहिती होती. त्यांनीही याचा खुलासा करावा, असे म्हणून आंबेडकरांनी मोदींवरही निशाणा साधला आहे.
१९९३ ते १९९५ च्या दरम्यान दाऊद इब्राहीम आत्मसमर्पण करण्यास तयार होता. याची माहिती राम जेठमलानींनी शरद पवारांना दिली होती. शरद त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पण, पवारांनी ही माहिती दडवली. आजपर्यंत त्यांनी याबाबतची माहिती लपवून ठेवली होती. त्यामुळे मला ती आज समोर आणावी लागत आहे, असे आंबेडकर म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही याची माहिती होती. ते शरद पवारांच्या घरी गेले होते. तेव्हा त्यांनी याचा खुलासा करावा, असे आंबेडकर म्हणाले. दाऊदला आणायचे असेल तर गाजावाजा न करता आणावे. आतापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी त्याचे आत्मसमर्पण न करुन घेता साटेलोटे केल, असा आरोप आंबेडकरांनी केला आहे. दाऊदच्या मुद्यावर नेहमीच राजकारण होत आले आहे, असेही ते म्हणाले.