मुंबई - मुंबई उपनगरातील नागरिकांना विरंगुळा ठिकाण असलेल्या पवई तलावाची आता पालिका मोठ्या प्रमाणत स्वच्छता आणि सुशोभीकरण करणार आहे. स्थानिक आमदार दिलीप लांडे यांच्या मागणीवरून तलाव सुशोभीकरण करण्याचा आराखडा बनवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी आज (11 ऑगस्ट) या तलावाची पाहणी केली.
पवई तलावाचे होणार सुशोभीकरण
या ठिकाणी गणेश मूर्ती विसर्जन, दुर्गामाता मूर्ती विसर्जन, छटपूजा असे विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. पवई तलाव हा एक निसर्गरम्य परिसर आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. त्यामुळे तलावाचे सुभोभिकरण करून निसर्गाचा अमूल्य ठेवा जपणे
आवश्यक आहे. आता या तलावाशेजारी जॉगिंग ट्रॅक, बगीचा, जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंच अशा विविध प्रकारच्या सोयी-सुविधा करण्यात येणारआहेत. तसेच तलावातील गाळ, वनस्पतींची साफसफाई करण्यात येणार आहे.
तलावात होणार संगीतयुक्त विद्युत रोषणाई
तलावात संगीताच्या तालावरील भव्य विद्युत रोषणाईयुक्त सात कारंजे बनविण्यात येणार आहेत. यासाठी पालिका तब्बल 100 कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्तांनी दिली आहे. तसेच, विहार तलावचे होणारे ओव्हर फ्लो पाणी भांडुप पंपिंग स्टेशनकडे वळवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. तर नरिमन पॉईंट, गिरगाव चौपाटीप्रमाणे इथे सुशोभीकरण होईल. तसेच पर्यावरणाच्या नियमाचे काटेकोर पालन करून इथला गाळ काढला जाणार असल्याचे आमदार लांडे यांनी सांगितले.
हेही वाचा - VIDEO : कोरोना नियमात शिथिलता, काय बंद, काय सुरू? पाहा...