मुंबई : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना नागरिक नियमांचे पालन करत नसल्याचे दिसत आहे. उलट रस्त्यांवर, बाजारपेठेत गर्दी वाढताना दिसत आहे. परिणामी परिस्थिती चिंताजनक बनली आहे. मुंबईतही बाजारपेठेतील गर्दी कायम राहिली तर आज कठोर निर्णय घ्यावा लागेल, असे संकेत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत. रविवारी दादर परिसरातील मंडईची पाहणी केल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
विनाकारण घराबाहेर पडू नका
मुंबईतील रुग्णसंख्या रोज वाढत आहे. शनिवारी ९ हजार नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले. वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकार आवश्यक त्या उपाययोजना करत आहे. मात्र, मुंबईकरांकडून नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दादर मार्केटमध्ये जाऊन पाहणी केली. यावेळी ग्राहकांना आणि दुकानदारांना गर्दी होऊ न देण्याचे आणि होम डिलिव्हरीची सुविधा सुरू करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच, कारण नसताना घराबाहेर पडू नका. आरोग्य यंत्रणेला सहकार्य करा. कोरोना नियमांचे पालन करा, मास्क लावा, अशाही सूचना त्यांनी नागरिकांना दिल्या.
लॉकडाऊन लागू नये हीच इच्छा
मुंबईत लॉकडाऊन लागू करावा, अशी आमची इच्छा नाही. परंतु, मार्केटमधील गर्दी अशीच राहिली तर आजच्या आजच निर्णय घ्यावा लागेल. मुंबईत आजच कठोर निर्बंध लागू करावे लागतील, असे अस्लम शेख यांनी सांगितले. रोज दहा-दहा हजार रुग्ण सापडणे हे काही चांगली लक्षणे नाहीत आणि ते परवडणारेही नाही. त्यासाठी नागरिकांनी कोरोना नियम पाळलेच पाहिजे. स्वत:च्या आणि इतरांच्या प्रकृतीची काळजी घेतलीच पाहिजे. आता कुठे लोकांची गाडी पटरीवर आली आहे. आता कुठे व्यवहार सुरळीत झाले आहेत. लोकांना अधिक त्रास होऊ नये, ही आमची इच्छा आहे. पण लोकांनीही त्याचे भान राखले पाहिजे, असे शेख म्हणाले.
...तर बेड्सही कमी पडतील
मुंबईत बेड्स आणि औषधांचा पुरेसा साठा आहे. कशाचीही कमतरता नाही. पण परिस्थिती अशीच राहिली तर या सुविधांचीही कमतरता पडू शकते, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली.
लॉकडाऊन की निर्बंध?
मुंबईत लॉकडाऊन लागू करणार की कठोर निर्बंध लागणार? याबाबतचे तर्कवितर्क लढविले जात आहेत. लॉकडाऊनच्या भीतीने अनेक जण कुटुंबांसह गावाकडे निघाले आहेत. मात्र, पूर्णतः लॉकडाऊन ऐवजी संचारबंदीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईबाबत आज काय निर्णय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबईत कहर सुरूच
मुंबईत शनिवारी कोरोनाचे 9,090 रुग्ण सापडल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. मुंबईत सद्यस्थितीत 62 हजार 187 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. मुंबईतील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी कमी होऊन 44 दिवसांवर आला आहे. गोरेगाव विभागात हेच प्रमाण 33 दिवस, वांद्रे पश्चिम येथे 34 दिवस, अंधेरी पूर्व – जोगेश्वरी येथे 37 दिवस, चेंबूर – गोवंडी विभागात 37 दिवस आणि अंधेरी पश्चिम येथे 38 दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्या दुप्पट होत असल्याचे आढळून आले आहे. मुंबईत दररोज सुमारे 42 ते 45 हजार कोरोना चाचण्या केल्या जात आहेत.
हेही वाचा - नक्षलवाद्यांकडून माजी उपसरपंचाची गोळ्या झाडून हत्या
हेही वाचा - ३० वर्षांपासून 'ती' राहतेय पोलीस ठाण्यात!