मुंबई - अरबी समुद्रावर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रीयवात स्थिती निर्माण झाल्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. ४८ तासांमध्ये मान्सून अधिक सक्रिय होऊ शकतो. त्यामुळे राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार सरी आणि मेघगर्जनेची शक्यता आहे. मात्र मुंबईला याचा कोणताही धोका नाही. मुंबईमध्ये 24 तारखेपर्यत रिमझिम पावसासह थंड वातावरण राहील, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.
कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यावर ढगही दिसू लागतात. मात्र मुंबईमध्ये ढगाळ वातावरण असले तरी जोरदार पाऊस पडणार नाही, त्यामुळे मुंबईकरांनो घाबरण्याचे कारण नाही, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. यामुळे उद्या मतदान सुरळीत पार पडण्यास मदत होऊ शकते.
हेही वाचा - परतीचा मुसळधार; कोयना धरणाचे चार दरवाजे १ फुटाने उघडले
कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण येथे बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कमी दाबाचे पट्टा निर्माण झाले तरी याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता नसल्याचेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.