मुंबई- कुलाब्यातील शिवस्मारकाच्या ऑफिसला गळती लागली असून त्याची दुरावस्था झाली आहे. त्यावर शिवसंग्रामचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच शिवस्मारकाचं काम लवकरात लवकर सुरू करा. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा विनायक मेटे यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण जबाबदार
या कार्यालयाप्रमाणेच शिवस्मारकाचही काहीही झालेलं नाही. उद्धव ठाकरे यांनी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. मुख्यमंत्र्यांनी गड-किल्ल्यांची माहिती मागवण्याचे काम सुरू केलं आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. पण स्मारकासाठी काहीच हालचाल सरकारकडून झालेली नाही. या सरकारला केवळ मते हवी आहेत. त्यांना स्मारकाच्या कामाचं काहीही पडलेलं नाही. याला मुख्यमंत्री ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणच जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी केला.
आंदोलनाचा ईशारा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2017 साली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देशातील सर्वात मोठं स्मारकाचं भूमिपूजन करण्यात आले. त्या स्मारकासाठी जे ऑफिस तयार करण्यात आले आहे. ते ऑफिस केवळ देखभाली अभावी पुर्णपणे उद्धवस्त झाले असल्याचं समोर आले आहे. ही बाब नुकतीच शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख आमदार विनायक मेटे यांनी समोर आणली आहे. या ऑफिसमध्ये तयार करण्यात आलेला कॉन्फरन्स हॉल, शिवस्मारक कृती समितीचे अध्यक्ष यांचे दालन, स्वीय सहायक यांचं दालन याची पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. जर हे ऑफिस पुन्हा उभारल नाही तर आम्हाला सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा विनायक मेटे यांनी दिला आहे.