मुंबई : Political leaders Reaction on India Meeting मुंबईतील सांताक्रुज येथील ग्रँड हयात या आलिशान हॉटेलमध्ये इंडिया आघाडीची तिसरी बैठक पार पडत आहे. गुरुवार आणि शुक्रवार दोन दिवस ही बैठक या हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली असून, या बैठकीच्या खर्चाचा लेखाजोखाच राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी मांडत जोरदार आक्षेप घेतला आहे.
जेवणावळींवर लाखो रुपयांची उधळण : ग्रँड हयात हॉटेलमध्ये सुरू असलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये प्रचंड खर्च करण्यात येत आहे. या बैठकीसाठी केवळ 65 खुर्च्यांवर 45 हजार रुपये खर्च केले गेले आहेत. केवळ काही तासांच्या बैठकीसाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यात येत असल्याची टीका, उदय सामंत यांनी केली आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर काही आमदार जेव्हा गुहाटीला गेले होते, त्यावेळेस झालेल्या हॉटेलच्या खर्चावर महाविकास आघाडीने जोरदार टीका केली होती.
एका वेळच्या थाळीला साडेचार हजार रुपये : इंडिया आघाडीने बुक केलेल्या ग्रँड हयात मधील एका खोलीचा दर हा प्रतिदिन 25 ते 30 हजार रुपये इतका आहे. त्यामुळे या खर्चाबद्दल आता इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी बोलणार का? असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला. या बैठकीसाठी उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांच्या जेवणासाठी एका वेळच्या थाळीला साडेचार हजार रुपये मोजण्यात येणार आहेत. त्यामुळे इतका प्रचंड खर्च करणाऱ्या इंडिया आघाडीने किंवा महाविकास आघाडीने आमच्यावर बोलू नये, त्यांना आमच्यावर बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही असंही सामंत म्हणाले.
हा तर असंतुष्टांचा मेळावा : मुंबईत सुरू असलेल्या इंडिया आघाडीची बैठक म्हणजे सत्ता न मिळाल्याने, असंतुष्ट राहिलेल्यांचा मेळावा आहे. देशाचं नाव राजकारणासाठी वापरणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. आगामी लोकसभा निवडणुका झाल्यानंतर इंडिया निश्चितच संपुष्टात येईल असा दावाही यावेळी सामंत यांनी केला. बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अनेक पक्षांचा या इंडिया आघाडी समावेश आहे का याकडे उदय सामंत यांनी लक्ष वेधलं आहे.
ठाकरे पवार खालच्या स्थानावर : इंडिया बैठकीची यादी जी प्रसिद्ध झाली आहे किंवा जी यादी हॉटेलकडे गेली आहे, त्या यादीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला २६व्या क्रमांकावर स्थान आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 25 व्या स्थानी बसवण्यात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात स्वतःला महत्त्वाचे आणि बलशाली पक्ष मानणाऱ्या या पक्षांना शेवटून दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर इंडिया आघाडीने नेऊन ठेवलं आहे, अशी टीकाही सामंत यांनी यावेळी केली.
2024 लोकसभा निवडणुकी संदर्भात मोठा दावा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी लोकसभा निवडणुकी संदर्भात मोठा दावा केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत इंडियाचा मोठा विजय होईल, असं त्यांनी म्हटलं आहे. सोबतच या दोन दिवसांच्या बैठकीच्या खर्चाबाबत प्रश्न विचारला जात आहेत. या खर्चाचा हिशोब महाआघाडीवडून मागितला जात आहे. यालासुद्धा आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे.
पंतप्रधान चेहऱ्यासाठी अनेक पर्याय : यावेळी बोलताना आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले की, जुडेगा भारत जीतेगा इंडिया, आमचा लढा हुकूमशाहीविरुद्ध आहे. देशात परिवर्तन होईल. आमच्या राज्यातील काही भ्याड लोक ईडीच्या भीतीनं भारतीय जनता पक्षासोबत गेले आहेत. भाजपाला इंडियाची भीती वाटते. आम्ही भाजपाला जिंकू देणार नाही. लोक आमच्यात सामील होत आहेत. इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत आदित्य ठाकरे म्हणाले, भाजपा ज्या प्रकारे आम्हाला टार्गेट करत आहे, त्यावरून ते इंडिया आघाडी आणि आमच्या विजयाला घाबरले आहेत. आम्ही त्यांना जिंकू देणार नाही. भाजपाकडे पर्याय नाही, पण आमच्याकडे पंतप्रधान चेहऱ्यासाठी अनेक पर्याय आहेत.
गुवाहाटीचा सर्व खर्च कोणी केला होता : दोन दिवसांच्या बैठकीच्या खर्चाबाबत प्रश्न विचारले जात आहेत. या खर्चाचा हिशोब महाआघाडीकडून मागितला जात आहे. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, त्यांनी आधी सांगावं त्यांचा सुरत, गुहाटी, गोवा हा सर्व खर्च कोणी केला होता? इतके दिवस हे लोक बाहेर राहिले, फिरले त्या विमानाचा आणि राहण्याचा खर्च कोणी केला? त्यांच्यासोबत जे गेले त्यांना 50 कोटी देण्यात आले. त्या 50 कोटींचा खर्च कोणी केला? इतकच काय वर्षानुवर्षे चालू झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर देखील यांनी लक्ष ठेवलं. आमच्या मेळाव्यापेक्षा अधिक मोठा मेळावा करण्यासाठी त्यांनी एसटी महामंडळाला दहा कोटी रुपये दिले. हे दहा कोटी रुपये कुठून आले? हा खर्च कोणी केला? ही सगळी माहिती त्यांनी आधी दिली पाहिजे.
हेही वाचा -
- INDIA meeting in Mumbai : 'इंडिया' च्या बैठकीत काय असणार अजेंडा? लालूप्रसाद यादव यांनी दिली स्पष्ट माहिती
- INDIA Meeting in Mumbai: 'इंडिया'च्या बैठकीत महाविकास आघाडीत 'अशी' असणार जबाबदारीची विभागणी
- INDIA Meeting in Mumbai : मुंबईत होणाऱ्या 'इंडिया'च्या बैठकीवरून उद्धव ठाकरे व काँग्रेसमध्ये प्रतिष्ठेची लढाई, एकवाक्यता होईना!