मुंबई - भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी शरद पवारांनी नवीन आघाडीसाठी मोर्चेबांधणी तयारी केली आहे. यासाठी दिल्लीत 'राष्ट्रमंच' महत्वाची बैठक बोलवण्यात आली. मात्र, या बैठकीतून काँग्रेसला दूर ठेवण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्षाला काँग्रेस वगळता इतर पर्याय निर्माण होऊ शकतो का यासाठीची ही शरद पवारांची तयारी असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी यांनी व्यक्त केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी (दि. 22 जून) दिल्लीमध्ये बैठक बोलावली. या बैठकीतून शरद पवार नवीन आघाडीबाबत चाचपणी करत आहेत. या बैठकीसाठी बिगर भाजपा आणि खास करून प्रादेशिक पक्षांना आमंत्रण देण्यात आले आहे. तसेच काही सनदी अधिकारी आणि इतर क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रण दिले. मात्र, या बैठकीला मुख्य विरोधी पक्ष असलेला काँग्रेस पक्षाला आमंत्रण नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. या बैठकीसाठी समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, आम आदमी पक्षासह 15 पक्षांच्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आले. मोदी विरोधक मानले जाणारे यशवंत सिन्हा यांच्या 'राष्ट्र मंच'च्या बिगर राजकीय संस्थेच्या माध्यमातून ही बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत खास करून देशातील विद्यमान राजकीय परिस्थिती, देशातील कोविड परिस्थिती आणि कोविड परिस्थितीत केंद्र सरकारने घेतलेले निर्णय, केंद्र सरकारची वादग्रस्त धोरणे या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. मात्र, या बैठकीतून काँग्रेसला दूर ठेवण्यात आल्याने पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाला काँग्रेस हा पर्याय असू शकत नाही का, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. नवीन आघाडीतून काँग्रेसला दूर ठेवून एक नवीन पर्याय जनतेसमोर उभा करण्याचा प्रयत्न शरद पवारांचा असल्याचे मत राजकीय विश्लेषक योगेश त्रिवेदी यांनी व्यक्त केले आहे.
काँग्रेसला आघाडीतून वगळले जातेय ?
2024 च्या लोकसभा निवडणूक लक्षात घेता भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीत पराजीत करण्यासाठी सर्व भाजप विरोधी पक्षांना एकत्र करुन मोठ बांधण्याची सुरुवात या बैठकीतून झाल्याचे समोर येते. मात्र, सध्या केंद्रामध्ये मुख्य विरोधी पक्षाला या बैठकीतून बाजूला ठेवल्या गेल्यामुळे अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. भारतीय जनता पक्षाला पर्याय म्हणून 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अजूनही काँग्रेसकडे पर्याय म्हणून पाहिले जात नाही, अशी मानसिकता विरोधी पक्षांच्या नेत्यांची तयार झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षाला जनतेसमोर ठेवून निवडणूक लढवली गेली तर, यश मिळेल का ? याबाबत अनेक पक्षांना अजूनही संशय आहे. काँग्रेस पक्षाकडून राहुल गांधी यांना पुढील पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित केले गेले नसले तरी, काँग्रेस पक्ष भावी पंतप्रधान म्हणूनच त्यांच्याकडे पाहत आहे. मात्र, काँग्रेससह सर्वच विरोधी पक्ष एकत्र आले तर पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून राहुल गांधी यांच्याकडे पाहिले जाईल ही भीतीही इतर पक्षांना आहे. त्यामुळे नवीन आघाडी तयार करताना काँग्रेस पक्षाला सध्या तरी बाजूला ठेवून विरोधी पक्षाच्या ताकतीची चाचपणी या बैठकीतून शरद पवार घेत आहेत.
शरद पवारांच्या पंतप्रधान पदाच्या आशा अजूनही पल्लवित
देशाच्या पंतप्रधान पदावर बसण्याची इच्छा शरद पवारांनी कधी बोलून दाखवली नसली तरी, त्यांची ही इच्छा सर्वश्रुत आहे. काँग्रेस पक्षाला नवीन आघाडीत सोबत घेतले तर, पंतप्रधान पदावर शरद पवारांना थेट दावेदारी करता येणार नाही. त्यामुळे इतर पक्षांची मोट बांधणी केल्यानंतर काँग्रेसला या आघाडीत सामील करून घेतले तर पंतप्रधान पदाच्या दावेदारी साठी शरद पवारांना दारे खुली राहतील, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात या बैठकीनंतर सुरू झाली आहे.
दिल्लीसह राज्यातही काँग्रेसला एकाकी पाडण्याचा प्रयत्न.?
राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून लढाव्या, अशी वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून केली जात आहेत. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल, अशी घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि विधानसभेची निवडणूक काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीत लढवेल का ? याबाबत शाश्वती देता येत नाही. मात्र, येणार्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सोबत लढवेल, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनासोबत लढताना दिसेल. पण, काँग्रेस राज्यातही एकाकी पडल्याचे चित्र पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भाजप विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे नेतृत्व शरद पवारांकडे
2024 चा लोकसभा निवडणुकीत केंद्रातील मोदी सरकार पाडायचे असेल तर देशातील सर्व भाजप विरोधी पक्षांना एकत्र आणावे लागेल. या सर्व पक्षांना एकत्र आणण्याची ताकद असणारा नेता म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिले जात आहे. राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांनीही मुंबईत आल्यानंतर शरद पवार यांची भेट घेतली होती. तसेच शरद पवार आता असलेल्या दिल्ली दौऱ्यात सर्वात अधी प्रशांत किशोर यांना भेटले. या दोन्ही भेटीमध्ये 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला कसे रोखता येईल, याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच नवीन आघाडी तयार केली जाणार असेल तर त्याचे नेतृत्व शरद पवार यांनी केले पाहिजे, अशी चर्चा या भेटीदरम्यान झाल्याचे समजते. मात्र, शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीमध्ये नवीन आघाडी संदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, सध्या शरद पवार ज्या पद्धतीने विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे काम करत आहे. त्यावरून 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षासमोर काँग्रेस वगळता नवीन पर्याय उभा केला जाऊ शकतो का याची चाचपणी सुरू झाली आहे. त्यासाठी शरद पवारांचे नाव आघाडीवर आहे.