मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसूली संचलनालयाकडून (ईडी) समन्स बजावण्यात आले आहे. तसेच त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार ते गुरुवारी सकाळी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत. त्याच पार्श्वभुमीवर ईडी कार्यालय आणि दक्षिण मुंबईकडे येणारे रस्ते तसेच संभाव्य आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच डॉ. आंबेडकर रोड आणि पूर्वमुक्त मार्ग एक्झिटला नाकाबंदी करण्यात आली आहे.
दरम्यान, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, असे कोणतेही कृत्य मनसेच्या कार्यकर्त्यांनी करू नये यासाठी मनसेच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेत अडथळा निर्माण केल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. मात्र, राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
राज यांना नोटीस बजावण्यात आल्यानंतर सुरुवातीला ठाणे बंदचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. त्याचप्रमाणे २२ ऑगस्टला कार्यकर्ते आणि नेत्यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर जमण्याचे आवाहन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत केले होते. मात्र, काही वेळातच राज ठाकरे यांच्या आदेशानंतर हा निर्णयही मागे घेण्यात आला होता. मात्र, यानंतरही कार्यकर्ते कायदा हातात घेण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी नोटीस बजावली आहे. तीन तासापेक्षा अधिक काळ चौकशी चालण्याची शक्यता असल्याने परीसरारात जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.