मुंबई - माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना बुधवारी रात्री दिल्लीत सीबीआयने अटक केली आहे. त्यानंतर त्याचे पडसाद देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उमटले असतानाच मुंबईत मात्र मुंबई प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन येथे स्मशान शांतता पसरलेली आहे. त्यातच राजीव गांधी भवन आणि आजूबाजूच्या परिसरात सकाळपासून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरात दुपारपर्यंत एकही कार्यकर्ता फिरकला नसल्याचे चित्र आहे.
मुंबई प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन येथे सकाळपासूनच शांतता पसरलेली आहे. त्यातच पोलिसांसह विविध यंत्रणा आजूबाजूच्या परिसरात असल्याने या परिसरात एकही कार्यकर्ता सकाळपासून फिरकला नाही, तर दुसरीकडे मुंबई प्रदेश अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्यासह कार्याध्यक्ष एकनाथ गायकवाड आदी नेतेही या परिसरात फिरकले नाहीत. त्याशिवाय युवक काँग्रेस, मुंबई महिला प्रदेश काँग्रेस आदींचे पदाधिकारीही या परिसरात फिरकले नसल्याचे दिसून आले.