मुंबई - पोलीस अधिकारी म्हटले की, कडक शिस्तीचे व्यक्तिमत्त्व समोर उभे राहते. अनेकदा चिरीमिरी घेणारे, भ्रष्ट, अशा नावांनीही पोलिसांना हिणवले जाते. मात्र याच खाकी वर्दीतील माणुसकीमुळे मुंबईतील मतदान केंद्रावरील अधिकाऱ्याचे प्राण वाचले आहेत. ही घटना आहे 21 ऑक्टोबर रोजी घडली असून हा सगळा प्रकार मतदान केंद्रावरील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
जयंत डोळे हे राज्यातील विक्रीकर विभागात विक्रीकर निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. 21 ऑक्टोबर रोजी मुंबईतील मलबार हिल येथील चंदा रामजी शाळेतील केंद्र मतदान केंद्रावर सकाळी साडेसातच्या सुमारास इव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे या ठिकाणी कर्तव्यावर हजर असलेले जयंत डोळे यांनी ही मशीन दुरुस्तीसाठी हाती घेतली होती. मात्र बराच वेळ होऊनही मशीन सुरू होत नसल्यामुळे तणावाखाली आलेल्या जयंत डोळे यांच्या छातीत दुखू लागले. याची तक्रार त्यांनी मतदान केंद्रावर कर्तव्यावर हजर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा सूर्यवंशी यांना केली.
हेही वाचा - राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार उपसचिवपदी दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ज्ञानोबा सूर्यवंशी यांनी त्यांचे सहकारी पोलीस शिपाई वैभव गिरकर यांच्यासोबत मिळून जयंत डोळे यांना तत्काळ रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. जयंत डोळे यांना चालणेही मुश्कील असल्यामुळे त्यांनी डोळे यांना खांद्यावर उचलून पोलिसांच्या गाडीने जेजे रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांनी आवश्यक असलेली पंपिंग ट्रीटमेंट जयंत डोळे यांना दिल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. सध्या जयंत डोळे हे सुखरूप असून पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा सूर्यवंशी आणि पोलीस शिपाई वैभव गिरकर यांनी दाखवलेल्या तत्परतेचे पोलीस विभागातून कौतुक होत आहे.