मुंबई - वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने संचारबंदी घोषीत केली आहे. या संचारबंदीत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू ठेवली आहे. मात्र, पहिल्या दिवशी सर्वसामान्य प्रवासी त्याच्यांकडील तिकीट पासद्वारे प्रवास करत होते. याबाबद सर्व प्रथम बातमी ईटीव्ही भारतने प्रकाशित केली होती. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने आजपासून अनावश्यक प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कडक कारवाई सुरू केली आहे. तसेच रेल्वे स्थानकावर पोलिसांचा कडक बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला बगल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवास करण्याची मुभा दिली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची कॅटेगिरी तयार करण्यात आली आहे. विनाआवश्यक घराबाहेर पडू नका, असे आवाहन स्वतः मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्यानंतरसुद्धा पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडले होते. तसेच सर्रासपणे लोकल प्रवास करत असल्याचे चित्र दिसून आले होते. अनेकांनी आपल्या तिकीट पासद्वारे प्रवास करत होते. मात्र, रेल्वे स्थानकांवर या प्रवाशांची ओळख पत्र तपासण्यात येत नव्हते.
कडक कारवाई सुरू
आजपासून अनावश्यक प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. प्रवाशांची ओळख पत्र बघूनच त्यांना रेल्वे स्थानकात प्रवेश देण्यात येत आहे. सध्या राज्यभरात कलम 144 अंतर्गत संचारबंदी लागू आहे. त्यामुळे या नियमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. कारवाईबरोबर आणि प्रवाशांमध्ये कोरोना सबंधित जनजागृती सुद्धा करण्यात येत आहे. सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळण्याचे आवाहनही पोलीस करत असल्याची माहिती पोलीस कॉन्स्टेबल गोरखनाथ मोहिते यांनी दिली.
प्रवाशांची अडवणूक सुरू
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या रेल्वे स्थानकात प्रवेश द्वारावर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच लाऊड स्पीकरद्वारे प्रवाशांना सूचना दिल्या जात आहे. तसेच प्रत्येक प्रवाशांचे ओळखपत्र तपासूनच आता प्रवेश देत आहे. सीएसएमटी, भायखळा, दादर, ठाणे, कल्याण, डोबिवली, चर्चगेट, मुंबई सेंट्रल, अंधेरी, बोरिवली सारख्या प्रमुख रेल्वे स्थानकांवरील अनेक प्रवेशद्वार बंद सुद्धा केले आहेत. त्यामुळे आता अनावश्यक प्रवास केल्यास पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहेत.