मुंबई - धारावीत कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. धारावीसारख्या झोपडपट्टीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग करणे अशक्य आहे. दरम्यान, लॉकडाऊन असताना देखील अनेक जण अनावश्यक बाहेर पडताना दिसत आहेत.
सरकारने धार्मिक स्थळी न जाण्याचे आवाहन केले असूनही काही लोक प्रार्थना करण्यासाठी एकत्र जमले होते. त्यांच्यावर धारावी पोलिसांनी कारवाई केली आहे. धारावीतील संत ककैया मार्ग याठिकाणी मुस्लिम समाजातील सहा जण पार्थनेसाठी जमले होते. त्यांच्याविरुद्ध धारावी पोलिसांनी कारवाई केली आहे. कोरोनाबाबत महाराष्ट्र शासन व पोलीस प्रशासनाने वेळोवेळी जाहीर केलेल्या आदेशाची अवहेलना करून प्रार्थना करण्यासाठी एकत्र जमून सार्वजनिक उपद्रव करून कोरोना या आजाराचा संसर्ग पसरविणे तसेच मानवी जीवीत व व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात येईल, अशी घातक कृती करून शासनाच्या विविध आदेशाचा भंग केला म्हणून १७८ / २०२० कलम १८८ , २६९ , २७० , भारतीय दंड संहिता आणि साथीरोग प्रतिबंध अधिनीयम १८९७ चे कलम २ , ३ , ४ सह ३७ ( १ ) ( ३ ) १३५ म . पो . का . सह महाराष्ट्र कोविड – १९ चे नियम ११ अन्वये नोंद करण्यात आला आहे . गुन्ह्यात एकूण सहा आरोपींना अटक करुन जामीनावर मुक्त करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.