मुंबई- नेहरूनगर पोलीस ठाण्यासमोरील पोलीस वसाहतीत एका पोलीस कर्मचाऱ्याला काल (सोमवारी) रात्री सापाने दंश केला. झोपेत असताना चावलेल्या या 4 फूट लांबीच्या सापामुळे पोलिसाचा मृत्यू झाला. सुनील तुकाराम भगत (वय 35) असे मृत पोलिसाचे नाव असून ते शिवाजीनगर पोलीस ठाणे, पुणे शहरात कार्यरत होते.
हेही वाचा- सुडाचे राजकारण करु नये, चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला
नेहरूनगर कुर्ला पूर्व येथील पोलीस वसाहतीत 110 क्रमांकाच्या तळमजल्यावरील खोलीत वास्तव्यास असलेले सुनील भगत हे त्यांच्या खोलीमध्ये काल रात्री झोपले होते. रात्री 3.30 वाजेच्या दरम्यान अचानक त्यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांनी पत्नी समृद्धीला (देवनार पोलीस ठाणे हवालदार मुंबई) उठवले. त्यावेळी पत्नी पिण्याचे पाणी आणण्यासाठी स्वयंपाक घरात गेली असताना त्याना एक साप सिलेंडर खाली जात असल्याचे निदर्शनास आले. यावेळी सुनील भगत यांना अशक्तपणा वाढत होता. यावेळी पत्नी व शेजाऱ्यांनी जवळील नेहरूनगर पोलीस ठाण्यात संपर्क साधला. तत्काळ पोलिसांनी भगत यांना सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. स्वयंपाक घरातील तो विषारी कोब्रा साप सर्पमित्र सुनील कदम यांनी पकडला असून त्यास जंगलात सोडून दिले आहे.अधिक तपास नेहरूनगर पोलीस करीत आहेत.