मुंबई - कोरोनाच्या संकटात अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी निष्ठेने लढत आहेत. यामध्ये पोलीस बांधव देखील आपल्या जिवाची पर्वा न करता दिवस-रात्र सेवा देत आहेत. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या डॉक्टरांसह पोलीस तसेच सफाई कर्मचार्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसापूर्वी मुंबईतील एका पोलीस कर्मचाऱ्यालाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यांच्या तब्येतीने साथ न दिल्यामुळे त्यांचा आज मृत्यू झाला.

कोरोनामुळे मृत पावलेले पोलीस कर्मचाऱ्याचे वय हे ५७ वर्षे होते. ते वरळी नाका मुंबई येथे राहत होते. त्यांचं मूळ गाव हे फनसगाव ता. देवगड जिल्हा-सिंधुदुर्ग हे आहे. पोलीस प्रशासनात ते १ डिसेंबर १९८८ रोजी भरती झाले होते. १९८८ पासून त्यांनी अविरत पोलीस सेवा केली. पण काळाने आज त्यांचा घात केला. त्यांच्यामागे २ मुले व १ मुलगी व पत्नी असे कुटुंब आहे. मृत पोलीस हवलदार हे वाकोला पोलीस ठाणे येथे कार्यरत होते.