मुंबई - कर्ज स्वरूपात घेतलेल्या वस्तू कर्ज न फेडातच विकणाऱ्या भामट्याला पोलिसांनी अटक केली आहे. दिवाकर जयस्वाल असे आरोपीचे नाव आहे. मुंबईतील नामांकित इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात जाऊन बजाज फायनान्स, रिलायन्स फायनान्स, कॅपीटल फर्स्ट, अशा विविध बड्या फायनान्स कंपन्यांच्या नावावर हप्त्याने इलेक्ट्रॉनिक वस्तू त्याने घेतल्या होत्या. या वस्तूंच्या कर्जाचे हफ्ते न भरता वस्तू परस्पर विकून टाकत होता. आत्तापर्यंत आरोपील जयस्वालने साथीदारांच्या सहाय्याने वित्तीय संस्थांना 15 लाखांचा चुना लावला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मुंबईतील नामांकित इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्ये दिवाकर जयस्वाल हा रेकॉर्डवरील आरोपी जाऊन बनावट पॅनकार्ड, बँक पासबुक, रहिवाशी दाखला यांच्याबरोबर इतर बनावट कागदपत्रे जमा करून महागडे मोबाईल फोन व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू विकत घेत असे. या वस्तू विकत घेण्यासाठी काही प्रमाणात डाऊन पेमेंट रोख करून संबंधित वस्तूचे कर्ज खासगी वित्तीय संस्थांकडून घेतले जात होते. वस्तू मिळाल्यानंतर आरोपी आणि त्याचे काही साथीदार हे ती वस्तू विकून फरार होत असे. अशा प्रकारे आतापर्यंत आरोपीने त्याच्या साथीदारांसोबत मिळून वेगवेगळ्या वित्तीय संस्थांना 15 लाखांचा चुना लावला आहे.
या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या मालमत्ता शाखेकडे आल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करीत आरोपीला अटक केली. याप्रकरणी इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.