मुंबई - परदेशी नागरिकांचे भाडे स्विकारून निर्जनस्थळी पोहोचताच त्यांना धमकी देऊन किमती ऐवज लुटण्याचा प्रयत्न करणारा रिक्षाचालक ३ वर्षांनंतर गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला आहे. मोहम्मद राशीद शेख (वय २९) असे अटक झालेल्या रिक्षाचालकाचे नाव असून त्याची चौकशी पार्क साईट पोलीस करत आहेत.
तीन वर्षांपूर्वी २४ एप्रिल २०१६ ला पवई हिरानंदानी येथे जाण्यासाठी आगीता शिकेरा या जपानी नागरिकाने शेखची रिक्षा बोलावली. पुढे काही अंतरावर गेल्यानंतर शेखने शिकेरा यांना धमकी देऊन त्यांच्याकडील डॉलर तसेच अन्य वस्तूंची मागणी केली. प्रवाशाने नकार देताच शेखने रिक्षाचा वेग वाढवला. अपहरणाच्या भितीने जपानी प्रवाशाने धावत्या रिक्षातून उडी मारली. यामध्ये तो जखमी झाला.हे पाहून शेखने पळ काढला. यानंतर त्या जपानी प्रवाशाला स्थानिकांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी अकिरा शिगेता यांनी पार्क साईट पोलीस ठाण्यात रिक्षाचालकाविरुद्ध तक्रार दाखल केली होती.
त्यानुसार, पार्कसाईट पोलिसांसह गुन्हे शाखेने मुंबईतील सर्व रिक्षाचालकांचा शोध सुरु केला. मात्र फरार झालेल्या शेखपर्यंत पोहोचण्यास पोलिसांना अडचणी निर्माण झाल्या. आता अखेर तीन वर्षांनी तो घाटकोपर येथे राहत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ७ ला मिळाली. त्यानुसार, गुरुवारी सापळा रचून शेखला अटक करण्यात आली, असे गुन्हे शाखेचे सतीश तावरे म्हणाले. तपासात त्याच्याविरुद्ध घाटकोपर, पवई येथे मोबाईल चोरीचे दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली. त्याने, अशा प्रकारे अनेक परदेशी नागरिकांना लुटल्याचा संशय गुन्हे शाखेला आहे. त्यानुसार,पार्क साईट पोलीस अधिक तपास करत आहेत.