मुंबई- दादरच्या हिंदमाता परिसरातील नुकत्याच चर्चित आलेल्या 'रजनीकांत डोसा'वाल्यावर पोलीसांनी कारवाई केली आहे. या डोसावाल्याचे मुळ नाव मुत्तू अण्णा आहे. काही दिवसांपूर्वीच या डोसावाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात पसंतीही मिळाली होती. त्यानंतर आता पोलीसांनी कारवाई करत 'रजनीकांत डोसा'वाल्याची गाडी जप्त केली आहे. मुत्तू अण्णांच्या यांच्या डोसाच्या प्लेट फेकण्याच्या स्टाईलवरून त्यांना रजनीकांत डोसावाला नावाने ओळखले जाते.
मुत्तू अण्णांविरोधात तक्रार दाखल
मुत्तू अण्णांच्या डोस्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांची चर्चा खूप झाली. आणि याच गोष्टीचा मोठा फटका मुत्तू अण्णांना बसला आहे. त्या व्हिडिओनंतर काही लोकांनी अण्णांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती, की हा डोसेवाला रस्त्यावर गाडी लावतो आणि गर्दी जमा करतो. त्या तक्रारीनंतर भोईवाडी पोलिसांनी कारवाई करत त्यांचा डोसाचा स्टॉल जप्त केला आहे.
कोरोना नियम न पाळल्याचा आरोप
मुत्तू डोसा कॉर्नरविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद कांबळे यांनी दिली. तसेच कोविड काळातही मुत्तू अण्णा यांनी आपल्या गाडीवर खाणाऱ्यांची गर्दी जमा केली होती त्यामुळे आम्ही केलेली कारवाई योग्य असल्याचे कांबळे म्हणाले.
पुन्हा स्टॉल सुरू
कारवाईनंतर पुन्हा मुत्तू अण्णा डोसाचा स्टॉल पून्हा सुरु करण्यात आला आहे. मात्र, यंदा कोरोना संदर्भातील नियम काटेकोरपणे पाळण्याची सूचना त्यांना देण्यात आली आहे.