मुंबई - दिवाळी तोंडावर आल्यामुळे आम्ही दिवाळी कशी साजरी करायची? आम्ही आमची आयुष्याची जमापुंजी पीएमसी बँकेत ठेवी स्वरूपात ठेवलेली होती. मात्र आता जगावं, की मरावं असा प्रश्न आमच्यासमोर आहे, असे खातेदारांचे म्हणणे आहे. आज मुंबईतील आजाद मैदानात बँक ग्राहकांनी येऊन आंदोलन केले.
अडीच हजार कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळाप्रकरणी पीएमसी बँकेच्या दोन संचालक तसेच एचडीआय कंपनीचे राकेश वाधवा आणि सारंग वाधवा यांना अटक करण्यात आलेली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या संदर्भात जवळपास सहा हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. मात्र, अद्यापही रिझर्व्ह बँकेकडून पीएमसी बँकेच्या खातेदारांना कुठलाही दिलासा देण्यात आलेला नाही. चरणजीत सिंग सप्रा यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. यंदाची दिवाळी ही पीएमसी बँक ग्राहकांसाठी काळी दिवाळी असल्याचे म्हणत शासनाने याप्रकरणात त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे.