मुंबई – काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी कोरोना व्हायरस महामारीचा सामना करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘पीएम केअर्स’ फंडावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला. चव्हाण यांनी म्हटले, की पीएम केअर्स म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘‘स्व-प्रचाराचा निर्लज्ज प्रयत्न’’ आहे. जगात अशाप्रकारचे दुसरे उदाहरण शोधून सापडणार नाही.
पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करून म्हटले आहे, की केवळ भारतातच कोरोना मदतनिधी पॅकेजला पंतप्रधान गरीब कल्याण योजना असे नाव दिले आहे. नरेंद्र मोदी स्वत: च्या प्रचाराची एकही संधी सोडत नाहीत. जगातील दुसऱ्या कोणत्याच नेत्याने मदतनिधी पॅकेजची घोषणा करताना त्याला राष्ट्रपती पॅकेज, पंतप्रधान पॅकेज किंवा ट्रम्प पॅकेज असे नाव दिलेले नाही.
पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले, की पंतप्रधान मदत निधी तत्कालीन पंतप्रधान जवाहर लाल नेहरू यांनी पाकिस्तानातून येणाऱ्या शरणार्थींच्या मदतीसाठी जानेवारी १९४८ साली घोषित केला होती. नरेंद्र मोदी यांच्याशिवाय दुसऱ्या कोणत्याच पंतप्रधानांना दुसरा राष्ट्रीय राहत कोष निर्माण करण्याची आवश्यकता भासली नाही.
पीएम केअर्स स्व प्रचाराचा खुला प्रयत्न आहे. कोरोना व्हायरस महामारीपासून बचावासाठी बनविण्यात आलेल्या पीएम केअर्स कोष मध्ये अनेक उद्योगपती व अभिनेत्यांनी योगदान देण्याची घोषणा केली आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून 1.70 लाख कोटी रुपयांचे पॅकेज घोषित केले आहे.