मुंबई - महानगरात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मात्र, यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाकडून आरोग्य उत्सव साजरा केला जात आहे. या उत्सवात आतापर्यंत तब्बल १५० दात्यांनी प्लाझ्मा दान केला आहे. हा प्लाझ्मा पालिकेच्या रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी दिला जाणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब कांबळे यांनी दिली.
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. पाच महिन्यानंतरही कोरोनाचे हजारच्या आसपास रुग्ण रोज आढळून येत असल्याने यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले. याला प्रतिसाद देत मुंबईतील मंडळांनी लहान मूर्तींची प्रतिष्ठापना केली. तर, लालबागचा राजा मंडळाने मूर्तीची प्रतिष्ठापना न करता आरोग्य साजरा करण्यास सुरुवात केली आहे. गणेशोत्सवादरम्यान मंडळातर्फे अकरा दिवस प्लाझ्मा आणि रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
प्लाझ्मा दानमुळे कोरोनाच्या रुग्णांना बरे करण्यास मदत मिळत असल्याने प्लाझ्मा दान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. त्यात आतापर्यंत १५० जणांनी प्लाझ्मा दान केला आहे. ३५० जणांनी मंडळाकडे यासाठी नावे नोंदवली आहेत. हा प्लाझ्मा पालिकेच्या रुग्णालयांना तसेच खासगी रुग्णालयांना दिला जाणार आहे. २२ ऑगस्टपासून मंडळातर्फे रक्तदान शिबीर सुरू आहे. त्यात दररोज सरासरी ७०० पेक्षा जास्त रक्तदान होत आहे. 31 ऑगस्टपर्यंत रक्तदान सुरू राहणार आहे.
गलवान खोऱ्यात देशासाठी धारातीर्थी पडलेल्या २२ सैनिकांच्या कुटुंबीयांना मंडळातर्फे १५ ऑगस्ट रोजी प्रत्येकी २ लाख रुपये देण्यात आले आहेत. मुंबई व महाराष्ट्रातील शहीद पोलीस कर्मचारी बांधवांच्या ५१ कुटुंबीयांना मंडळाच्या वतीने २५ ऑगस्टपर्यंत शौर्यचिन्ह आणि प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या १११ पोलीस कर्मचाऱ्यांची यादी देण्यात आली आहे. त्यापैकी ५१ कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश व शौर्यचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तर, इतरांना ३१ ऑगस्टपर्यंत धनादेश व शौर्यचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल, असे कांबळे यांनी सांगितले.
हेही वाचा - परळ रेल्वे कार्यशाळेने बनवला जीवक रोबोट, कोरोना रुग्णांची काळजी घेणे होणार सोपे