मुंबई - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे देशातील प्रार्थनास्थळेही बंद होती. राज्यातील कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत घट होत असून परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. यातच भक्तांच्या दर्शनासाठी मंदिरं उघडावी अशी मागणी राज्यभरातून करण्यात येत होती. त्यानंतर राज्य सरकारने पाडव्याच्या मुहूर्तावर आजपासून मंदिरे आणि प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारच्या निर्णयानुसार मुंबईमधील अनेक मंदिर, मशीद, गुरुद्वारा, चर्च आजपासून उघडण्यात आली आहेत. यात प्रामुख्याने प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर, पंढरपुरातील विठ्ठल मंदिर, कोल्हापुरातील अंबाबाई देवीचे मंदिर, शिर्डी साई बाबा मंदिर, नांदेड गुरुद्वारा आणि मुंबईतील हाजी अली दर्गा ही प्रार्थनास्थळे आज भक्तांसाठी खुली झाली असून येथे भक्तांची गर्दी पाहायला मिळाली. कोरोना संदर्भात सूचनांचे पालन करत भाविकांना प्रार्थनास्थळात प्रवेश देण्यात येत आहे.
जनतेच्या भावना लक्षात घेऊन सर्व धार्मिक स्थळे खुली -
मुंबई - कोरोनामुळे आठ महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील मंदिरे आजपासून भाविकांसाठी खुली झाली आहेत. राज्यभरातील सर्वच मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मुंबईच्या प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिरदेखील भाविकांसाठी खुले करण्यात आले. बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून मंदिराबाहेर रांगा लावल्या आहेत. कोरोनाच्या नियमावलीचे पालन करून भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येत आहे.
सविस्तर वाचा - मुंबईतील प्रसिध्द सिद्धिविनायक मंदिर खुले; भाविकांची गर्दी
पंढरपूर - दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले झाले आहे. सकाळी सहा वाजल्यापासून विठ्ठलाच्या मुखदर्शनाला सुरुवात झाली आहे. मंदिर प्रशासनाच्यावतीने कोरोना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने सर्व पावले उचलण्यात आली आहे. सकाळी सहा वाजता ज्या भाविकांनी ऑनलाइन बुकींग करून घेतले होते. त्यांना श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे मुखदर्शन करण्याची परवानगी देण्यात आली. सर्वप्रथम चेन्नईतील भक्तांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन घेतले. पहिल्या एका तासात 58 भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले आहे. विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.
सविस्तर वाचा - विठ्ठल मंदिरात मुखदर्शन सुरुवात; चेन्नईतील भक्तांना मिळाला सर्वप्रथम दर्शनाचा मान
कोल्हापूर - तब्बल 7 महिन्यानंतर करवीर निवासिनी आई अंबाबाईचे मंदिर उघडले आहे. त्यामुळे पहाटेपासूनच भक्तांनी मंदिराबाहेर दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक या ठिकाणी दाखल झाले असून या भाविकांमध्ये अंबाबाईचे दर्शन मिळणार असल्याने प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.
सविस्तर वाचा - अंबाबाई मंदिराचे दरवाजे पुन्हा उघडले; भाविकांची प्रचंड गर्दी
नांदेड - कोरोनामुळे मागील ८ महिन्यांपासून बंद असलेली प्रार्थनास्थळे आजपासून (सोमवार) उघडण्यास सरकारने मंजुरी दिली. सरकारच्या या निर्णयाचे नांदेडमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. नांदेडमध्ये जगप्रसिद्ध सचखंड गुरुद्वारा येथे देश-विदेशातील भाविक दर्शनासाठी येत असतात. आज गुरुद्वारा परिसर गर्दीने फुलून गेला असून भाविक व व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
सविस्तर वाचा - नांदेडचा सचखंड गुरुद्वारा भाविकांसाठी पुन्हा खुला...
शिर्डी (अहमदनगर) - पाडव्याच्या मुहूर्तावर शिर्डीचे साई मंदिर दर्शनासाठी कोरोनानंतर पुन्हा खुले करण्यात आले आहे. आज (सोमवारी) पहाटे साडेचारच्या काकड आरतीला 60 भाविकांना सोडण्यात आले होते. मंदिर उघडणार असल्याने पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली होती. मात्र याठिकाणी दर्शन व्यवस्थेचा संपूर्ण फज्जा उडाला आहे. स्व:त कार्यकारी अधिकाऱ्यांनीच सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन केले नसल्याने आणि भक्तांची दिशाभुल केल्याची तक्रार मुखमंत्र्याकडे करणार असल्याचे शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे आणि ग्रामस्थांनी सांगितले आहे.
सविस्तर वाचा - पहाटेच्या काकड आरतीने साई मंदिर खुले, पहिल्याच दिवशी दर्शन व्यवस्थेचा फज्जा
मुंबई - मुस्लिम धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेला वरळी येथील हाजी अली दर्गा आजपासून उघडण्यात आला. याठिकाणी कोरोना संदर्भात सूचनांचे पालन करत भाविकांना दर्ग्यामध्ये सोडण्यात येत आहे.
सविस्तर वाचा - उघडले देवाचे द्वार! हाजी अली दर्गावरही मुस्लिम बांधवांनी टेकला माथा