मुंबई - मुंबई उच्च न्यायालयात अलिबागवरून आला आहेस का? या डायलॉगवर बंदी आणावी यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. राजेंद्र ठाकूर यांनीही याचिका दाखल केली आहे.
अनेक मराठी, हिंदी चित्रपटात, मालिकांमध्ये तसेच दैनंदिन जीवनात संवाद साधत असताना एखाद्या व्यक्तीला कमीपणा दाखवण्यासाठी काय रे, अलिबागवरुन आला आहेस का? असा टोमणामारला जातो. त्यामुळे हा अलिबागकरांचा अपमान असून यासंदर्भात सीबीएफसी आणि राज्य सरकारच्या सांस्कृतिक खात्याने काहीतरी ठोस पावलं उचलावीत, अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे.
या याचिकेत सेन्सॉर बोर्डाने कोणत्याही जाहिरात, चित्रपटांना प्रमाणपत्र देताना अशा प्रकारचा उल्लेख काढून टाकण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे ही याचिका सुनावणीसाठी आली आहे. तूर्तास यावरची सुनावणी येत्या २ आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आली आहे.