मुंबई- मुंबईतील अनेक पूल ब्रिटिशकालीन असून ते धोकादायक बनले आहेत. त्यावर भार पडल्यास पूल कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे यावर्षी देखील गणेशभक्तांनी मिरवणूक काढू नये, पुलांवर गर्दी करू नये, लाऊड स्पीकर बंद ठेवावा आणि पुलावर थांबू नये, असे निर्देश महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. धोकादायक पुलांबाबत सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बैठक बोलावण्यात आल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
मागील वर्षी मुंबईतील सीएसएमटी येथील हिमालय पूल कोसळून ७ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पालिकेने मुंबईमधील पुलांचे ऑडिट केले होते. त्यात अनेक पूल धोकादायक असल्याने ते पाडावेत आणि नवीन बांधावेत, असा सल्ला देण्यात आला आहे. धोकादायक पुलांवर जास्त भार पडणार नाही याची काळजी पालिकेकडून घेतली जात आहे. याचाच एक भाग म्हणून मागील वर्षी पालिकेने धोकादायक असलेल्या पुलांवरून गणेशभक्तांनी मिरवणूक काढू नये, पुलांवर गर्दी करू नये, लाऊड स्पीकर बंद ठेवावा आणि पुलांवर थांबू नये, असे निर्देश दिले होते. दरम्यान, धोकादायक असलेल्या काही पुलांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहे, तर काही पुलांच्या दुरुस्तीची कामे पावसाळ्यानंतर करण्यात येणार आहेत. त्यामुळे, गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पालिकेने दिलेले निर्देश पाळावेत, आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहनही पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
१६ टनांपेक्षा जास्त भार नको..
गणेश आगमन, विसर्जनाच्या वेळी मिरवणूक काढू नये, गर्दी टाळावी. करीरोड ओव्हरब्रीज, ऑर्थर रोड ओव्हर ब्रीज, चिंचपोकळी रेल्वे ओव्हरब्रीज या पुलांवर भाविक व वाहनांचे मिळून एका वेळेस १६ टनांपेक्षा अधिक वजन होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच, पुलांवर लाऊड स्पीकर लावू नये, असे निर्देश पालिका व वाहतूक पोलिसांनी दिले आहेत.
धोकादायक पुलांबाबत बैठक..
मुंबईमधील धोकादायक पूल आजही उभे असून त्यावरून वाहतूक सुरू आहे. यामुळे एखादा अपघात होऊ नये म्हणून पालिकेने पुलांवरून गणेश मिरवणुकांबाबत निर्देश दिले आहेत. त्याचे भाविकांनी पालन करावे. जे पूल धोकादायक आहेत त्याबाबत येत्या २ किंवा ३ सप्टेंबरला बैठक होईल. त्यात हे पूल दुरुस्त करावेत की पाडून नवीन बांधावेत याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
'हे' पूल धोकादायक..
मध्य रेल्वेचे घाटकोपर रेल ओव्हर ब्रीज, करी रोड रेल ओव्हर ब्रीज, आर्थर रोड/चिंचपोकळी ओव्हर ब्रीज, भायखळा रेल ओव्हर ब्रीज, पश्चिम रेल्वे मरीन लाईन्स रेल्वे ओव्हर ब्रीज, सँडहर्स्ट रोड रेल्वे ओव्हर ब्रीज (ग्रँट रोड-चर्नी रोड दरम्यानचा), फ्रेंच रेल ओव्हर ब्रीज (ग्रँट रोड-चर्नी रोड दरम्यानचा), केनडी रेल्वे ओव्हर ब्रीज (ग्रँट रोड-चर्नी रोड दरम्यानचा), फॉकलँड रेल्वे ओव्हर ब्रीज (ग्रँट रोड-मुंबई सेंट्रल दरम्यानचा), मुंबई सेंट्रल स्टेशनजवळील बेलासीस ब्रीज, महालक्ष्मी स्टील रेल्वे ओव्हर ब्रीज, प्रभादेवी-कॅरोल रेल्वे ओव्हर ब्रीज, दादर टिळक रोड रेल्वे ओव्हर ब्रीज.
हेही वाचा- कोस्टल रोडमुळेच दक्षिण मुंबईची 'तुंबई'; पर्यावरण तज्ज्ञ व स्थापत्यशास्त्रज्ञांचे मत