मुंबई : मुंबई ते नागपूर या बहुचर्चित समृद्धी महामार्गावर दर दोन किलोमीटर अंतरावर ई चार्जिंग स्टेशन ( E Charging Station ) उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ७१० किलोमीटरच्या या महामार्गावर सुमारे साडेतीनशे चार्जिंग स्टेशन उभारले जाणार असल्याची माहिती ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांनी दिली आहे.
दर दोन किमी अंतरावर ई चार्जिंग स्टेशन - इंधन आयात कमी करण्याबाबत केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याने राज्यात जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनांचा वापर व्हावा, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. नागरिकांकडूनही इलेक्ट्रिक वाहनांना मिळणारा प्रतिसाद पाहता भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांसाठी ही चार्जिंग स्टेशन संख्या वाढवण्याची गरज आहे. त्यादृष्टीने ऊर्जा विभागाने नियोजन केले असून राज्य सरकारच्या प्रस्तावित नियोजनानुसार मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर प्रत्येक दोन किलोमीटरवर एक ई चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याची माहिती, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी दिली आहे.
समृद्धी महामार्गावर ई चार्जिंग स्टेशन - मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग हा 710 किलोमीटर लांबीचा मार्ग आहे. राज्य सरकारच्या प्रस्तावित नियोजनानुसार सुरुवातीला प्रत्येक वीस किलोमीटरवर एक ही चार्जिंग स्टेशन बसवणे निश्चित केले होते. मात्र इलेक्ट्रिक वाहनांची वाढती संख्या पाहता वाहनांची गैरसोय होऊ नये, यासाठी आता अशा प्रकारच्या इ चार्जिंग स्टेशनला प्रोत्साहन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक दोन किलोमीटरवर एक चार्जिंग स्टेशन बसवण्याच्या सूचना सरकारने दिले आहेत. त्यानुसार आता प्रत्येक दोन किलोमीटर नंतर म्हणजे सुमारे साडेतीनशे ही चार्जिंग स्टेशन या मार्गावर बसवण्यात येणार आहेत. यासाठी लागणारी दीडशे मेगा वॉट वीज निर्मिती ही राज्य शासनाने तयार ठेवल्याचे वाघमारे यांनी सांगितले.
चार्जिंग स्टेशनसाठी अनुदान योजना - इलेक्ट्रिक वाहनांकरिता चार्जिंग स्टेशन बनवण्यासाठी फास्ट चार्जिंगच्या स्टेशनला पाच लाख रुपये खर्च येतो. यापैकी 50 टक्के रक्कम ही अनुदान म्हणून दिली जाते तर स्लो चार्जिंग स्टेशनसाठी दहा हजार रुपये अनुदान दिले जाते. फास्ट चार्जिंग स्टेशनवर चार चाकी वाहने तर स्लो चार्जिंग स्टेशन वरती दुचाकी वाहने चार्ज केली जातात.
राज्यातील चार्जिंग स्टेशनची स्थिती - राज्यात सद्यस्थितीला 501 चार्जिंग स्टेशन्स कार्यरत आहेत. यामध्ये टाटा पॉवर यांच्याकडून 169, बेस्ट उपक्रमांकडून 25, अदानी पावर या कंपनीकडून 72 ही चार्जिंग स्टेशन कार्यरत आहेत. 2025 पर्यंत राज्यभरात 2375 स्टेशन चार्जिंग स्टेशन कार्यरत होतील. मुंबई - पुणे, मुंबई-नाशिक व नाशिक-पुणे महामार्गावर लवकरच ही चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात येतील, अशी माहिती वाघमारे यांनी दिली. या चार्जिंग स्टेशनला प्रति युनिट 5 रुपये 50 पैसे दराने वीज आकारली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
राज्यातील इलेक्ट्रिक वाहनांची संख्या - राज्यात सध्या 1 लाख 27 हजार इलेक्ट्रिक वाहने आहेत. यापैकी एक लाख चार हजार इलेक्ट्रिक दुचाकी आहेत. 3000 वाहने हे तिचाकी आहेत तर नऊ हजार चारचाकी वाहने सध्या रस्त्यावर धावत आहेत. भविष्यात मुंबईतील बेस्ट आणि राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस तसेच शासकीय वाहने सुद्धा इलेक्ट्रिक असतील, यासाठी इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुविधा मोठ्या प्रमाणात लागणार आहे. त्यासाठी सरकारने याची सुविधा केल्याचेही त्यांनी सांगितले.