नवी मुंबई - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सरकारी विमानाने प्रवास करायला महाविकास आघाडी सरकारने परवानगी नाकारल्याने विमानात बसलेल्या राज्यपालांना विमानातून उतरावे लागले. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी महाआघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. सरकारने राज्यपालांना विमानातून उतरवले, महाराष्ट्रातील जनता महाआघाडी सरकारचा घमंड उतरवेल, असेही त्यांनी म्हटले. ते आज नवी मुंबईमहापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत आले होते.
सरकारने राज्यपालांचा अपमान करण्याचे धोरणं हाती घेतल -
राज्यात कुठल्याही व्यवस्था योग्य पद्धतीने चालू द्यायची नाही, असे महाविकासआघाडीच्या सरकारने ठरवले आहे. त्यांना केंद्र सरकारने घेतलेले निर्णय नकोत, अगोदरच्या सरकारचे प्रकल्प नकोत, अशी आडमुठी भूमिका ठाकरे सरकार घेत आहे. तसेच राज्यपालांवर हीन दर्जाची टीका-टिप्पणी सुद्धा या सरकारने केली आहे. एकप्रकारे राज्य सरकारने राज्यपालांचा अपमान करण्याचे धोरण हाती घेतल्याचे त्यांनी म्हटले.
देशभरात महाराष्ट्राची बदनामी होत आहे -
राज्यसरकारच्या धोरणामुळे महाराष्ट्राची पूर्ण देशभरात बदनामी होत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचा अपमान हे सरकार करत आहे, असेही त्यांनी म्हटले.