मुंबई - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊनवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोशल मीडियावर सर्व्हे घेतला होता. त्या सर्व्हेत नागरिकांनी भाग घेत लॉकडाऊन उघडण्यावर कौल दिला आहे. या सर्व्हेनुसार 70.3 टक्के नागरिकांना लॉकडाऊन संपुष्टात यावे, असे वाटते. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी केलेल्या सर्व्हेचा कौल आज (25 ऑगस्ट) जाहीर करण्यात आला आहे.
या सर्व्हेत विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांवर 54 हजार 177 नागरिकांनी आपली मते नोंदवली. नागरिकांनी दिलेल्या या कौलावरून सरकारला एक प्रकारची धोक्याची घंटा दाखवली आहे. लॉकडाऊनमुळे ठाकरे सरकारवर लोक असंतुष्ट असल्याची प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी व्यक्त केली. सरकारने लोकांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. यासाठी सर्व्हेचा अहवाल आम्ही शासनाकडे सादर करणार असल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले.
मनसेकडून सर्व्हेत विचारण्यात आलेल्या लॉकडाऊन बाबतच्या प्रश्नाला 70.3 टक्के नागरिकांनी लॉकडाऊन संपुष्टात आणण्याला पसंती दर्शवली, 26 टक्के नागरिकांच्या मत लॉकडाऊन सुरू ठेवण्याकडे होते तर 3.7 टक्के नागरिकांनी तटस्थ राहणे पसंत केले. लॉकडाऊनच्या काळात 89.8 टक्के नागरिकांच्या मते नाकरी व उद्योग-धंद्यावर नकारात्मक परिणाम झाला आहे. 8.7 टक्के नागरिकांच्या मते कोणताच परिणाम झाला नाही तर 1.5 टक्के नागरिकांनी तटस्थ मत नोंदवले.लॉकडाऊनच्या काळात आपल्या गेलेल्या नोकरी व बुडालेल्या उद्योगधंद्यासाठी सरकारकडून योग्य मदत करण्यात आली का याबाबत सर्व्हेमध्ये प्रश्न विचारण्यात आले होते. याला 8.7 नागरिकांनी होय, 84.9 टक्के नागरिकांनी नाही, असे उत्तर नोंदविले तर 6.4 टक्के नागरिकांना याबाबत काहीच माहिती नसल्याचे उत्तर दिले. कोरोना व लॉकडाऊनच्या काळात मुख्यमंत्र्यंच्या कामकाजावर आपण समाधानी आहात का, या प्रश्नाला उत्तरत 28.4 टक्के जणांनी होय, 63.6 टक्के नागरिकांनी नाही तर 8 टक्के नागरिकांनी माहित नसल्याचे नोंदवले.
हेही वाचा - बंदी घातलेले चिनी अॅप वापरतो महाराष्ट्र भाजप, सचिन सावंत यांचा आरोप