मुंबई - कोरोनाने झोपडपट्टी भागातही आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यातही दिलासादायक म्हणजे दहिसर पूर्वेकडील धारखाडी, केतकीपाडा परिसरातील 7 तरुणांनी कोरोनावर मात केली असून सुखरूप घरी परतले आहेत. मंगळवारी ते घरी परतताच स्थानिकांनी पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले.
मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून कोरोना दाटीवाटीच्या वस्तीतही हातपाय पसरवले आहे. मात्र, काहीजणांनी कोरोनावर मात केली असून पूर्ण बरे होऊन ते घरी परतत आहेत. दहिसर पूर्वेकडील ७ बाधित तरुणांनी कोरोनावर मात केली असून ते पूर्ण बरे होऊन घरी परतले. यावेळी, परिसरातील रहिवाशांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून स्वागत केले.
दहिसर पूर्व सारख्या परिसरात कोरोना रुग्ण आढळताच वैद्यकीय अधिकारी तसेच पालिका प्रशासन यांनी खूप मेहनत घेतली. त्यामुळे, कोरोनामुक्त झाल्याच्या आनंदात इकडेतिकडे फिरणे, गर्दी करण्यासारख्या गोष्टी टाळायला हव्यात. कारण यामुळे पुन्हा गंभीर परिस्थिती निर्माण होवू शकते, त्यामुळे प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन शिवसेनेचे शाखाप्रमुख प्रकाश पुजारी यांनी केले आहे.