मुंबई - कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भावामुळे जारी असलेले प्रतिबंधात्मक आदेश व लॉकडाऊनची नियमावली या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील धारावी बहुसंख्य मुस्लीम बांधवांनी रमजान ईद शांततेत व सुरळीत पार पाडली. तसेच मशीद अगर सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण न करता घरातच नमाज पठण केले. घरीच शीरकुरमा बनवून ईद शांततेत साजरी करत आहेत. धारावीत मोठ्या प्रमाणात मुस्लीम बांधव राहतात. दरवर्षी ईद निमित्ताने धारावीत मोठा उत्साह असतो. नवीन कपडे परिधान करत. सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम आयोजित करत, शीरकुरमा शेजारीपाजारी वाटला जातो. परंतु यंदा कोरोनाच्या सावटामुळे हे दिसत नाही.

कोरोनाचा प्रादुर्भाव धारावीत मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. याची खबरदारी म्हणून पोलीस प्रशासन आणि राजकीय मंडळींनी आवाहन केल्यानुसार सर्व मुस्लीम बांधव आज घरच्या घरी साध्या पद्धतीने ईद साजरी करत आहेत. कोरोनाचे संपूर्ण देशावर संकट आहे. त्यामुळे सर्वत्र लॉकडाउन असल्यामुळे सर्वांचे आर्थिक गणितदेखील बिघडलेले आहे. यामध्ये हिंदू बांधवांचे सण येऊन गेले तेदेखील शांत पध्दतीने सर्वांनी साजरे केले. धारावीतील शहीद भगतसिंग नगर भागातील मुस्लिम बांधवांनी रस्त्यावरील गरीब लोकांना जेवण वाटत ईद साजरी केली. दरवर्षी आम्ही ईद निमित्ताने मोठ्या प्रमाणात खर्च करतो परंतु यंदा देशावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे आम्ही ईदला खर्च न करता. आमच्या धर्मात सांगितल्यानुसार गरिबांना अन्नदान करत ईद साजरी करत आहोत, असे इस्माईल शेख यांनी सांगितले.
दरवर्षी ईद निमित्ताने आम्ही सामूहिक नमाज पठण करतो. त्यानंतर कुटुंबीयांना तसेच शेजारीपाजारी यांना भेट देत ईदच्या शुभेच्छा देतो. त्यानंतर पाहुण्यांकडे तसेच पर्यटन स्थळाकडे फिरण्यासाठी जातो व सायंकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवून त्याचा आनंद लुटत उत्साहात साजरी करतो. परंतु कोरोनाचे सावट असल्याने घरातच नमाज पठाण करून घरातच शिरखुर्मा बनवला. सामूहिक आर्थिक मदत करत गरिबांना जेवण वाटप केले, असेही शेख यांनी सांगितले.