मुंबई Patra Chawl Scam : पत्रा चाळ घोटाळ्यातील मनी लाँड्रिंग प्रकरणातील साक्षीदाराच्या घरावर धमकीचं पत्र फेकलं गेलं आहे. ऐन दिवाळीच्या सणात अशा प्रकारची घटना घडल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. साक्षीदार असलेल्या स्वप्ना पाटकर यांनी या प्रकरणी सांताक्रुज इथल्या वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून वाकोला पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
घरावर फेकलं धमकीचं पत्र : पत्रा चाळ घोटाळा प्रकरणातील साक्षीदार असलेल्या स्वप्ना पाटकर यांनी सांताक्रुजमधील वाकोला पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार वाकोला पोलिसांनी धमकी दिल्या प्रकरणी भारतीय दंड विधान कलम 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हा अदखलपात्र गुन्हा अज्ञात व्यक्तीच्या विरोधात दाखल केलेला असून वाकोला पोलीस याचा तपास करत आहेत.
जास्त फडफड करु नको, अन्यथा : स्वप्ना पाटकर यांनी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार त्यांच्या राहत्या घराच्या आवारात कोणीतरी एक बाटली फेकली होती. त्या बाटलीमध्ये एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीमध्ये त्यांना न्यायालयात आवाज न उठवण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. 'जास्त फडफड करू नकोस, तुम्ही खूप आवाज करत आहात, आवाज काढू नका आणि मोठ्या लोकांची नावं घेऊ नका, हेच तुम्हाला वाचवेल", असा या चिठ्ठीत मजकूर असल्याचा दावा स्वप्ना पाटकर यांनी केला आहे.
पोलीस करत आहेत तपास : स्वप्ना पाटकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बुधवारी रात्री एक वाजता त्यांच्या घराच्या आवारात काचेची बाटली फुटल्याचा आवाज आला. सुरक्षा कर्मचार्यांकडं चौकशी केली असता, फुटलेल्या बाटलीच्या आतमध्ये एक कागद सापडल्याचं स्पष्ट झालं. त्यात धमकीचा मजकूर वाचून स्वप्ना पाटकर यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. त्यानंतर वाकोला पोलीस ठाण्यातील अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्या पोलीस अधिकाऱ्यानं ते पत्र मराठी भाषेत असून ते लिहिलेलं असल्याचं सांगितलं. पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलीस घटनास्थळी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज स्कॅन करत आहेत. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे पत्राचाळ प्रकरणातील आरोपी असून ते सध्या जामिनावर बाहेर आहेत. पुढील तपास वाकोला पोलीस आणि मुंबई गुन्हे शाखा करत आहे.
हेही वाचा :