मुंबई - मुंबई विद्यापीठातील प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांनी आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेत शिक्षणातील राजकीय आखाड्यात उडी घेतली आहे. पार्थच्या या भेटीमुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना एक नवीन ऊर्जा मिळणार असल्याची प्रतिक्रिया संघटनेचे मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांनी 'ईनाडू इंडिया'शी बोलताना दिली.
यावेळी विद्यापीठातील अनेक प्रश्नांवर पार्थने राज्यपालांशी चर्चा करत परीक्षा आणि गोंधळाच्या प्रश्नावर एक निवेदन दिले. शालेय शिक्षण मंत्री आणि विद्यापीठातील कुलगुरू हे येथील प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना कोणी वाली उरला नसल्याची भावना तयार झाली असून त्यासाठी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आता आपणच लक्ष घालावे, अशी विनंती यावेळी करण्यात आली असल्याचे अॅड. मातेले यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठातील प्रश्नांसंदर्भात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेनेही काही दिवसांपूर्वी राज्यपालांची भेट घेतली होती. त्याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी घेतलेल्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राज्यातील शिक्षणाच्या प्रश्नावर आता पार्थ महत्वाची भूमिका बजावू शकतील, अशी अपेक्षा विद्यार्थी प्रतिनिधींमधून व्यक्त केली जात आहे, तर दुसरीकडे पार्थ यांच्या या भेटीने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसमध्ये एक नवी ऊर्जा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
