मुंबई - कोरोनाचा वाढता प्रसार पाहता मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ‘परळचा राजा’ने एक मोठा निर्णय घेतला आहे. दरवर्षी मंडळाकडून 23 फूट गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. मात्र, यंदा केवळ 3 फूट गणेश मूर्तीची स्थापना करण्यात येणार असल्याचे मंडळाचे खजिनदार बबन शिरोडकर यांनी सांगितले आहे.
यंदा परळच्या राजाचे विसर्जनही कृत्रिम तलावात करण्यात येईल. तसेच 'श्रीं'च्या मूर्तीची विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार नाही. तसेच विभागातील लोकांकडून वर्गणी न घेण्याचा निर्णयही मंडळाने घेतला आहे.
कोरोना महामारीचे संकट संपूर्ण भारतावर कोसळले आहे. हे संकट पाहता मंडळाने 23 फूट उंचीची मूर्ती स्थापन न करता तीन फुटांची मूर्ती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आर्थिक संकट पाहता यंदा कोणत्याही प्रकारची वर्गणी मंडळ यंदाच्या वर्षी घेणार नाही. कोणत्याही प्रकारचा आगमन सोहळा करणार नाही. विसर्जन सोहळाही कृत्रिम तलाव बांधून जवळच करण्याचे ठरवले आहे, असे शिरोडकर यांनी सांगितले.