मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांसाठी विद्यार्थी आणि पालकांना शालेय शुल्क मागणीचा तगादा लावू नये, असा निर्णय घेण्यात आला आहे. तरिही कोणी शुल्क मागितले तर याविषयी जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक) कार्यालयाशी संपर्क साधावा, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
राज्यातील कोरोना आजाराच्या फैलावामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. 3 मे २०२० पर्यंत संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सर्व नागरिकांना घरामध्येच राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कोवीड - १९ कोरोना या आजाराचे संक्रमण होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच बऱ्याच पालकांनी या कालावधीमध्ये शाळेची फी जमा करण्याचा कालावधी चालू वर्षाकरीता तसेच आगामी वर्षाकरीता म्हणजेच सन २०१९ -२०२० आणि सन २०२०-२०२१ वाढवून देण्याची विनंती केली होती.
नागरिकांना जाणवणाऱ्या अडचणींचा विचार करता, सर्व बोर्डाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना विनंती करण्यात आली आहे की, विद्यार्थी आणि पालकांकडून शाळेची चालू वर्षाची आणि आगामी वर्षाची फी गोळा करताना सहानुभूती दाखविणे आवश्यक आहे. त्यामुळे फीसाठी तगादा लावू नये, असे पत्रक शिक्षण विभागाने जारी करत शिक्षणमंत्री गायकवाड यांनी माहिती दिली.