मुंबई : आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असणारे बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री 18 आणि 19 तारखेला म्हणजेच शनिवारी आणि रविवारी मुंबईतील मिरा रोड येथे येणार आहेत. मुंबईत त्यांचा दोन दिवस दरबार लागणार असून, बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमाला लाखो लोक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धिरेंद्र शास्त्री यांच्या दरबाराचा कार्यक्रम भाजपच्या आमदार गीता जैन यांनी आयोजित केला आहे. काही दिवसांपूर्वीच धीरेंद्र शास्त्री नागपूर येथे आले असता अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. यानंतर धीरेंद्र शास्त्री हे राष्ट्रीय माध्यमांमध्ये झळकले. नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमानंतर वीरेंद्र शास्त्री पहिल्यांदाच महाराष्ट्रात येत आहेत.
संत तुकाराम महाराजांचा अपमान : श्याम मानव यांनी धिरेंद्र शास्त्री यांच्यावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा जादू टोना विरोधी कायद्या अंतर्गत कारवाईची मागणी केली होती. यानंतर धीरेंद्र शास्त्री हे राष्ट्रीय माध्यमांमध्ये सातत्याने झळकू लागले. धीरेंद्र शास्त्री हे त्यांच्या दैवी शक्ती असल्याचा दावा करत असतात. यानंतर धिरेंद्र शास्त्री चर्चेत आले ते त्यांनी संत तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. धीरेंद्र शास्त्रींनी 'तुकाराम महाराजांची पत्नी त्यांचा छळ करत असल्याचे म्हटले होते. त्यामुळे तुकाराम महाराज हे घरी न राहता ध्यानधारणा नामस्मरणात रमले.' असे वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला होता.
वारकरी संप्रदायाची भूमिका : धीरेंद्र शास्त्री ने तुकाराम महाराजां बद्दल केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. 'धीरेंद्र शास्त्री यांनी तुकाराम महाराजांचा अपमान करून संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्या श्रद्धेला तडा गेला आहे. अशा संत तुकाराम महाराजांचा अपमान करणाऱ्या धिरेंद्र शास्त्री यांचा कार्यक्रम महाराष्ट्रात होऊ देणे म्हणजे अंधश्रद्धेला वाव देण्यासारखे आहे. त्यामुळे यापुढे धिरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमाला महाराष्ट्रात परवानगी देऊ नये.' अशी मागणी त्यावेळी वारकरी संप्रदायाकडून करण्यात आली होती.
संतांचा अपमान : कधी हिंदुराष्ट्र, कधी बुलडोझर, तर कधी संतांचा अपमान या सर्व वादनंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात मुंबईमध्ये बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांचा दोन दिवस दरबार भरणार आहे. मिरा रोड येथील सालासर सेंट्रल पार्क येथे बागेश्वर बाबाचा दोन दिवस दरबार लागणार आहे. या दरबाराचा वेळ सायंकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत असणार आहे.