मुंबई - गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. सलग तिसऱ्या दिवशी मुंबईत पेट्रोलची किंमत २३ पैसे प्रतिलीटर तर डिझेलच्या किंमतीत ३१ पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आज (शनिवार) मुंबई पेट्रोलचे दर १००.२३ रुपये आणि डिझेलचे दर ९१.९७ रुपये इतका झालेला आहे. महाराष्ट्रातील बहुतांश शहरात पेट्रोलचे दर शंभरी गाठली आहे. तर डिझेलच्या दराने नव्वदी पार केली आहे. लॉकडाऊनमुळे आधीच नागरिकांचे कंबरडे मोडले असतांना आता सततच्या इंधन दर वाढीमुळे सर्व सामन्य नागरिकांना महागाईचा सामना करावा लागत आहे.
भारतात ग्राहकांना मिळणाऱ्या पेट्रोलच्या किंमतीमध्ये ६६ टक्के कर आकारला जातो. इंधनावर लावण्यात येणाऱ्या ६६ टक्के कराची विभागणी केंद्र आणि राज्य सरकारची वेगवेगळी असते. राज्य सरकारचा व्हॅट २६ टक्के तर केंद्र सरकार ४० टक्के असतो. त्यामुळे प्रतिलीटर पेट्रोलच्या दरात वाढ होते. हे सर्व कर आकारले नाही तर मुंबईकरांना प्रतिलीटर केवळ ३५ रुपये ६७ पैसे इतक्या स्वस्त दरात पेट्रोल मिळू शकते. पेट्रोल आणि डिझेलवर सर्वाधिक कर लादलेल्या देशांमध्ये भारत पाचव्या क्रमांकावर आहे. ब्रिटन, इटली, फ्रान्स आणि जर्मनी याठिकाणी भारतापेक्षा अधिक कर वसूल केला जातो. तसेच स्पेन, जपान, कॅनडा आणि अमेरिका यासारख्या देशांमध्ये कमी कर आकारला जात आहे. कन्सल्टन्सी फर्म ईवाय इंडियाच्या ताज्या आकडेवारीनुसार, जून २०२० मध्ये भारतात पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे ६६.४ टक्के आणि ६५.५ टक्के कर आकारण्यात आला. नऊ देशांपैकी ब्रिटन हे सर्वाधिक कर आकारणीचे राज्य आहे. जूनमध्ये पेट्रोलवर ७१.१ टक्के आणि डिझेलवर ६८.१ टक्के कर आकारला जात होता. अमेरिकेत पेट्रोलवर सर्वात कमी २३.१ टक्के कर आकारला गेला आणि डिझेलवर २३.३ टक्के कर आकारला गेला.
आजचे असे आहे दर -
आज दिल्लीत पेट्रोल ९३.९४ रुपये आहे. चेन्नईत एक लिटर पेट्रोलचा भाव ९५.९१ रुपये आहे. तर कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९३.९७ रुपये झाला आहे. मुंबईत आजचा एक लिटर पेट्रोलचा भाव १००.२३ रुपये आहे. दिल्लीत डिझेलचा भाव ८४.८९ रुपये आहे. चेन्नईत डिझेल ८९.६५ रुपये प्रती लीटर आहे. कोलकात्यात डिझेल ८७.७४ रुपये प्रती लिटर झाले आहे.
कमॉडिटी विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, इंधन मागणी वाढल्याने सध्या तेलाची बाजारपेठ तेजीत असल्याचे कमॉडिटी विश्लेषकांचे म्हणणे आहे. अमेरिकन पेट्रोलियम इन्स्टिट्युटच्या आकडेवारीनुसार २१ मे रोजी संपलेल्या आठवड्यात अमेरिकेत तेलाचा साठा ४.३९ दशलक्ष बॅरल आहे. त्यामुळे संपूर्ण आठवडा इंधनाला मागणी राहण्याची शक्यता आहे.
लॉकडाऊनसह महागाईने सामान्यांचे कंबरडं मोडले -
नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यातील निवडणुकांनंतर देशात इंधनाची दरवाढ सतत सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढ करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे देशात महागाईची झळ सर्व सामान्य नागरिकांना बसत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी पुन्हा एकदा पेट्रोलच्या दरात २३ पैसे आणि डिझेलच्या दरात ३१ पैशांनी वाढ केली आहे. यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात पेट्रोलने शंभरी पार झाले आहे. दरम्यान, मुंबईत यापूर्वीच प्रीमियम पेट्रोल शंभर रुपयांवर गेले आहे. आता तिसऱ्या दिवशी सलग मुंबईत आज पेट्रोल २३ पैशांनी वधारले आहे. कालपर्यंत ९९. ८१ रुपये पेट्रोलचे दर होते. आज मुंबईत १००.२३ रुपये दराने पेट्रोल ग्राहकांना खरेदी करावं लागतं आहे. डिझेलचे भाव देखील 31 पैशांनी वाढले असून डिझेल ९१.९७ रुपये दराने आता खरेदी करावे लागणार आहे. एकीकडे कोरोना, लॉकडाऊनची झळ सामान्यांना बसत असताना दुसरीकडे महागाईने देखील सामान्यांचे कंबरडे मोडले आहे.
हेही वाचा - राज्यात इंधनदराचा भडका; अनेक जिल्ह्यात पेट्रोल शंभरीपार