मुंबई- वंचित बुहजन आघाडीने पुकारलेला बंद यशस्वी झाला आहे. चार वाजल्यानंतर जनजीवन सुरळीत व्हावे यासाठी बंद मागे घेत आहोत, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत दिली.
हेही वाचा- धूत बंधुंना अटक करुन मालमत्ता जप्त करा; औरंगाबादेत व्हिडिओकॉन कर्मचाऱ्यांचे आंदोलन
आम्ही बंदसाठी जबरदस्ती केली नव्हती. तसेच हिंसाचारही केलेला नाही, असा दावा त्यांनी केला. औरंगाबाद, अमरावती, अकोला, चेंबूर, मुंबई याठिकाणी बंदला हिंसक वळण आले. मात्र, याठिकाणी हिंसा करणारे ते कार्यकर्ते आमचे नव्हते. आम्हाला जो मुद्दा जनतेपर्यंत पोहोचवायचा होता तो यशस्वीपणे पोहोचला आहे.
महाराष्ट्र बंदला १०० संघटनांनी पाठिंबा दिला होता. आम्ही सांगितल्या प्रमाणे या बंदमध्ये कोणत्याही उचित प्रकार घडला नाही. आमच्या कार्यकर्त्यांनी कुठेही जबरदस्ती केली नाही. अमरावतीत लाठीचार्ज झाला होता. मात्र, तो चुकीचा असल्याचे समजतात पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांना सोडून दिले आहे.
देशाची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली आहे. आमच्या अभ्यासानुसार ९ लाख कोटीची तूट या अर्थसकल्पात दिसून येणार आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प तोट्याचा आहे. या अर्थसंकल्पामुळे देशाचे नाक कापले जाईल. याची माहिती नागरिकांना मिळावी म्हणून आम्ही हा बंद पुकारला होता.
आज ५ वाजेपर्यंत जनजीवन पूर्ववत होईल. आमच्याकडे सव्वातीन हजार आंदोलकांवर गुन्हे दाखल झाल्याची माहिती आहे. आम्ही पोलिसांना विनंती करतोय, की त्या कार्यकर्त्यांनी कोणतेही हिंसक पाऊल उचलले नाही. त्यांना सोडून द्यावे, अशी माहितीही आंबेडकर यांनी दिली.