मुंबई - लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक उमेदवारांना पराभवाचे धक्के देणाऱ्या एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीची युती तुटल्याच्या चर्चांना राज्यभरात उधाण आले आहे. असे असताना शुक्रवारी सायंकाळी वंचित बहुजन आघाडीने मात्र आमची युती एमआयएमसोबत अजूनही कायम असल्याचा दावा केला आहे. यासाठी त्यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी करून आमची युती अद्याप तुटली नसल्याचेही स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यात जागा वाटपावरून बरेच मतभेद निर्माण झाले आहेत. त्यातच वंचितकडून जागा देण्याच्या संदर्भात समाधानकारक भूमिका समोर आली नसल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली होती. त्यामुळे आज (शुक्रवारी) एमआयचे खासदार इम्तियाज जलील यांनी काही माध्यमांना आमची युती तुटली असल्याचे जाहीर केले. त्यावर दिवसभर चर्चा सुरू असून सायंकाळी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी मात्र आमची युती अद्याप कायम असल्याचा दावा केला आहे.
एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी आपल्याकडे विधानसभेच्या निवडणुकीसाठी १७ जागांची यादी पाठवली असून त्यावर प्राथमिक चर्चा सुरू आहे. त्यामुळे आमच्यासोबत एमआयएमने युती तोडली आहे, अशा स्वरूपाचे कोणतेही पत्र आमच्याकडे आलेले नाही. त्यामुळे जोपर्यंत या पक्षाचे अध्यक्ष खासदार असरूद्दीन ओवैसी यांच्याकडून स्पष्ट निरोप येत नाही, तोपर्यंत आमची युती कायम असल्याचा दावा वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी केला आहे.