मुंबई - मराठी सिनेमा आंतरराष्ट्रीय स्तरावर जावा, यासाठी राज्य मराठी मंडळाकडून ४ वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या चित्रपट पुरस्कार सोहळ्याला ऑस्करचे अध्यक्ष जॉन बेली उपस्थित राहणार आहेत. ही माहिती आज (१३ मे) सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. यानिमित्ताने जॉन बेली हे पहिल्यांदाच भारतात येणार आहेत.
सिनेमॅटिग्राफर आणि एडिटिंगचे वर्क शॉपही यावेळी घेण्यात येणार आहे. ऑस्करचे कार्यालय मुंबईत आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे विनोद तावडेंनी यावेळी सांगितले. जॉन बेली हे पत्रकारिता शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशी देखील संवाद साधणार आहेत.
मराठी सिनेमा आंतराष्ट्रीय स्तरावर गेला पाहिजे, यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. गोवा आणि कांस फिल्म फेस्टीवलमध्ये मराठी चित्रपट गाजले आहेत. जॉन बेली हे मुख्यमंत्र्यांसोबतही संवाद साधणार आहेत, तसेच मराठी कलाकारांबरोबरही ते वेळ घालवणार आहेत. तसेच येणाऱ्या ५० वर्षात चित्रपटसृष्टी कुठे पोहचणार आहे, यावर देखील चर्चा होणार आहे. या भेटीमुळे मराठी चित्रपट सृष्टीला वेगळी दिशा मिळेल, असा विश्वास तावडे यांनी यावेळी व्यक्त केला.