मुंबई: महाराष्ट्र पोलिस भरतीसाठी ( Maha police recruitment ) अर्ज भरण्यात आले आहेत. या अर्जांमध्ये लिंग निवडताना महिला आणि पुरूष हाच पर्याय असल्याने ट्रान्सजेन्डर उमेदवारांनी महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाकडे दाद मागितली होती. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने सरकारला गृह विभागांतर्गत पदांसाठीच्या अर्जामध्ये ट्रान्सजेंडरसाठी तरतूद करण्याचे निर्देश दिले होते. मात्र महाराष्ट्र सरकारने या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
ट्रान्सजेंडरसाठी पर्याय: पोलीस भरती-2021 ( Police recruitment 2021 ) मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तृतीयपंथातील व्यक्तीसाठी पोलीस भरती-2021 मध्ये policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळावर तृतीयपंथातील व्यक्तीसाठी पर्याय उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. हा पर्याय पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक या पदासाठी १३ डिसेंबरपासून उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.
ट्रान्सजेंडरसाठी राखीव जागा: महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी, हायकोर्टाला सांगितले की, अर्जामध्ये 'लिंग' श्रेणीतील ट्रान्सजेंडरसाठी तिसरा ड्रॉप डाउन समाविष्ट करण्यासाठी आपल्या ऑनलाइन वेबसाइटमध्ये बदल करण्यात येईल. तसेच पोलिस कॉन्स्टेबलची दोन पदे ट्रान्सजेंडरसाठी ठेवल्या जातील. आयुक्तालये आणि जिल्हा युनिट्समध्ये 2021 साठी कर्मचार्यांची भरती सुरू आहे. मंगळवारपासून पोलिस भरतीसाठी वेबसाइटवर हा पर्याय सक्रिय केला जाणार आहे.
तृतीयपंथ्यांनी केली होती याचिका: महाराष्ट्रातल्या पोलीस कॉन्स्टेबल भरतीसंदर्भात एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. पोलीस कॉन्स्टेबल भरतीमध्ये आता महिला आणि पुरुषांसह ट्रान्सजेंडर्सनादेखील अर्ज करता येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भातली सुनावणी पार पडली आणि त्यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कोर्टाच्या नव्या आदेशांनंतर राज्यभरातल्या तृतीयपंथियांना पोलीस कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करता येणार आहे. याआधी फक्त पुरुष आणि महिलांनाच या पदांसाठी अर्ज करता येत होता; पण दोन तृतीयपंथीयांनी कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर या संदर्भात सुनावणी झाली. या सुनावणीत मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठाने तृथीयपंथीयांच्या हिताचा निकाल दिला होता.