मुंबई Politics On Shri Ram : 2020 साली अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी राम वर्गणीच्या माध्यमातून हिंदू संघटनांकडून मदतीचं आवाहन करण्यात आलं होतं. त्यावेळेस शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी 2024 च्या निवडणुकीचा छुपा प्रचार असल्याचा आरोप केला होता. (Opposition Accuses BJP) राम मंदिर उभारण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून मदत केली जात आहे. त्यात शिवसेनेकडून देखील एक कोटी रुपयांची देणगी दिली गेली होती. आज देखील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत बाबरी मशीद प्रकरणी शिवसैनिकांवर मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल झाले असल्याचं वारंवार सांगत आहेत; मात्र याचं श्रेय आता भाजपा घेऊन हा भाजपाचा कार्यक्रम असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.
विरोधकांना त्यांची जागा दाखविली जाईल: राम मंदिरावरून राजकारण केलं जातंय असं विरोधकांचं म्हणणं आहे. यांना मी राजकीय विरोधक नाही तर हिंदू विरोधक असल्याचं शिंदे गटाचे प्रवक्ते संजीव भोर पाटील यांनी म्हटलं. प्रभू रामचंद्र देशातील कोट्यवधी जनतेचे श्रद्धास्थान आहेत. राम मंदिराची उभारणी करण्याला राजकारण म्हणणं फक्त आणि फक्त हिंदू द्वेशाने पछाडलेले लोकचं करू शकतात. सातत्यानं हिंदूंना दुर्लक्षित करायचं अशा प्रकारची कूटनीती विरोधकांची राहिली आहे. दुसऱ्या बाजूला बहुसंख्य हिंदूंच्या भावनांचा आदर करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. तुमच्या भावनांना न्याय देण्याचं काम जर राजकारण असेल तर अशा विरोधकांना देशातील हिंदू बांधव जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते संजीव भोर पाटील यांनी केला आहे.
जय श्रीराम राजकीय नारा- विकास लवांडे: भारतात भाजपाने आणि त्यांच्यासोबत असलेल्या आरएसएसच्या संघटनांनी प्रभू श्रीराम यांच्या नावाने 'जय श्रीराम' हा राजकीय नारा देऊन लोकांच्या धार्मिक भावनांचं राजकारण केलं आहे. भाजपा राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केला आहे. 'जय श्रीराम' हा नारा तर लोकांचा आहे. राम कृष्ण हरी, रामराम, प्रभू रामचंद्रांची तत्त्वे मात्र भाजपा आणि आरएसएस घेत नाही. धर्माच्या नावानं राजकारण करणं हे आपल्या राज्यघटनेला अभिप्रेत नाही. भारतीय राज्यघटना सेक्युलर आहे. त्यामुळे येथे सर्व धर्मांना समान वागणूक दिली जाते. पंतप्रधान स्वधर्माच्या नावानं राजकारण करत असेल तर त्यांनी इतर धर्माला देखील न्याय द्यावा. भाजपा देवधर्माचं जे राजकारण चालवलं आहे ते हिताचं नसून भविष्यकाळात ते घातक असल्याचं म्हटलं आहे.
राम नावाचं राजकारण चालणार नाही: देशात निवडणुका येतात त्यावेळी जात आणि धर्माचे मुद्दे पुढे केले जातात. आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अयोध्येत राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशभर भाजपाने रान उठवलं होतं. आता राम मंदिर पूर्ण होत आहे आणि पुढील महिन्यापासून भाविकांसाठी ते खुलं देखील होणार आहे. धार्मिक आणि आरक्षणाचे मुद्दे पुढे आणणे हे भारतासारख्या विकसनशील देशात घातक असल्याचं राजकीय विश्लेषक आनंद गायकवाड यांनी व्यक्त केलं आहे. यामुळे विचाराने आपण पाठीमागे जात आहोत. राम मंदिर हा आस्थेचा प्रश्न आहे निवडणुकांचा नाही. राजकीय नेत्यांना माहीत आहे की, लोकं दुसरं प्राधान्य विकासाच्या कामांना देतात आणि पहिलं प्राधान्य ते जातीय आणि धार्मिक अस्मितेला देतात. रामाच्या नावानं राजकारण हे फार काळ टिकणारं नाही. कारण की जनता आता हुशार झाली आहे. एका बाजूला असं म्हटलं जातं की रामही पाहिजे आणि हाताला कामही पाहिजे. हे सर्वस्वी आता लोकांनी ठरवलं पाहिजे. श्रद्धेच्या विषयी जेव्हा राजकारण होतं, तेव्हा लोकांनी मत पेटीतूनच राजकीय नेत्यांना याचं उत्तर दिलं पाहिजे असं वक्तव्य राजकीय विश्लेषक आनंद गायकवाड यांनी केलं आहे.
उद्घाटनाच्या निमंत्रणावरून आरोप प्रत्यारोप: 22 जानेवारीला 2024 रोजी अयोध्यातील राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात राम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमंत्रणावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहे. या सर्व प्रकारात देशातील सामान्य जनतेच्या मूळ प्रश्नाला बगल तर दिली जात नाही ना असा प्रश्न सामान्य जनता उपस्थित करीत आहेत.
हेही वाचा: