मुंबई - यशवंत जाधव यांनी त्यांच्या एकाच वॉर्डमध्ये 33 कोटी रुपये कसे काय मंजूर करून घेतले? आणि अनेक वस्तू मोफत वाटल्या आहेत, असा आरोप नगरसेवक विनोद मिश्रा यांनी केला आहे. याबाबत विनोद मिश्रा यांनी कॅग, मुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती. याबाबतचा राग येऊन यशवंत जाधव यांनी त्यांना शिव्या दिल्याचा आरोप विनोद मिश्र यांनी केला आहे.
मी यशवंत जाधव यांच्या विरोधात मानहानीचा दावा करणार आहे. शिवाय माझी मुख्यमंत्र्यांना मागणी आहे की, त्यांनी यशवंत जाधव यांना सुरक्षा पुरवावी, कारण त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. ते स्वतःला संपवतील आणि मला मारण्याची धमकी तर दिलीच आहे, अशी प्रतिक्रिया विनोद मिश्रा यांनी दिली. या सगळ्या प्रकरणासंदर्भात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची भेट घेऊन यशवंत जाधव यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी असलेले पत्र आयुक्तांना दिले. तसेच विनोद मिश्रा यांच्या सुरक्षेची काळजी देखील मुंबई पोलिसांनी घ्यावी, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे. माध्यमांशी बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, ही अशी अभद्र भाषा एका जनप्रतिनिधीला शोभणारी नाही. त्यामुळे यशवंत जाधव यांनी आपल्या जिभेला आवर घालावा आणि राज्यातील मुख्यमंत्र्यांनी आपल्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना सांभाळावे ही विनंती मी करत आहे.