नवी मुंबई - कोरेगाव भीमा प्रकरणात शरद पवार नक्षलवाद्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. समाजात तेढ निर्माण करण्याचा पवारांचा प्रयत्न असून मतांच्या लांगूल चालनासाठी ते हे करत असल्याचे फडणवीस म्हणाले. भाजपच्या राज्य परिषद अधिवेशनात कार्यकर्त्यांना संबोधित करतांना त्यांनी पवारांनी जळगावात केलेल्या आरोपांना उत्तर दिले.
गृहमंत्री पवारांच्या दबावाखाली
फडणवीस म्हणाले, कोरेगाव-भीमा प्रकरणानंतर शहरी माओवादाचा विषय समोर आला. त्या प्रकरणात पुणे पोलिसांनी पुरावे जमा केले. शहरी नक्षलवादी पकडले. ते नक्षलवादी उच्च न्यायालयात गेले, सर्वोच्च न्यायालयात गेले. त्यांना कुठेही जामीन मिळाला नाही. पोलिसांनी सर्व प्रकारचे पुरावे दिल्यानंतर देखील शरद पवारांनी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा - 'पुढे महाराष्ट्राची निवडणूक म्हणजे भाजपचा एकट्याचा लढा असेल'
महाराष्ट्राचे गृहमंत्री पवारांच्या दबावाखाली काम करत असल्याचे सांगत फडणवीस म्हणाले, 'एनआयएने संपूर्ण तपास आपल्याकडे घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी पवारांच्या दबावाखाली न्यायालयाला सांगितले की, एनआयएला तपास देणार नाही. मात्र, याठिकाणी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले पाहिजे. त्यांनी ठाम भूमिका घेतली आणि तपास एनआयएकडे दिला.'
जळगावात काय म्हणाले शरद पवार-
फडणवीस म्हणाले, आज शरद पवारांची पत्रकार परिषद पाहिली, त्यात त्यांनी म्हटले की, यांना कोणाला तरी वाचवायचे आहे, म्हणून एनआयएकडे तपास दिला गेला. पवारांच्या आरोपाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, 'आम्हाला कोणाला तरी वाचवायचे, यासाठी तुम्ही एसआयटी मागत नव्हता पवार साहेब, तुम्हाला भीती होती की चौकशीतून सत्य बाहेर येईल. सत्य बाहेर आले तर तुम्ही जे याठिकाणी असत्य सांगत होता, तुम्ही या प्रकरणाला जे वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करत होतात, मतांच्या लांगूलचालना करिता तुम्ही समाजात तेढ निर्माण करत होता. सत्य बाहेर आल्यानंतर तुम्ही जो विचार मांडण्याचा प्रयत्न करत होता त्याला हानी पोहोचली असती. म्हणून तुम्हाला एसआयटी करायची होती. पण प्रकरण एनआयएकडे गेले म्हणून तुमची तडफड चालली आहे.'
हेही वाचा - तुमच्यात हिंमत असेल तर लावा नवीन निवडणूक; तुम्ही तिघे आम्ही एकटे
पवार नक्षलवाद्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला. ते म्हणाले, 'देशाला हानी पोहचवण्याचा प्रयत्न करणारे, देशात अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नक्षलवाद्यांना तुम्ही कितीही पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तरी, आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.'