मुंबई - कोरोना उद्रेकामुळे राज्यात न भूतो न भविष्यती, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड केंद्रांमध्ये व्हेंटिलेटर नाहीत, हे जम्बो कोविड सेंटर आहेत की, कुणाला तरी लाभ देण्यासाठी तयार केलेल्या 'फॅसिलिटी' आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये काय भ्रष्टाचार झाला, हे उघड आहे. बीकेसी कोविड सेंटरचा गेल्या महिन्यातील मृत्यूदर ३७ टक्के आहे. हे कोविड सेंटर आहे की, मृत्यूचे आगार आहे. येथे आलेल्या प्रत्येक तिसऱ्या माणसाचा मृत्यू होत असेल, तर मग या कोविड सेंटरमध्ये नेमकं चाललं काय? कशा करीता आपण हे सुरू केलंय. ३७ टक्के मृत्यूदर जगात कुठेही नाही. ३७ टक्के लोकांचा कोविड सेंटरमध्ये येऊन मृत्यू होत आहे, ही अवस्था बिकट आहे, असे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुरवणी मागण्यांवरील चर्चेस सहभागी होताना बोलत होते. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ फक्त ९ हजार कोरोना रुग्णांनाच मिळाला आहे. महाराष्ट्रात सातत्याने २० टक्के संसर्ग दर असून, देशापेक्षा आणि अन्य राज्यांपेक्षा तो कितीतरी अधिक आहे. काल तर संसर्गाचा दर २५ टक्के होता. ही स्थिती भयावह आहे. कंगना रणौतमुळे मुंबई पोलिसांचा अपमान झाला. मी पोलिसांसोबत पाच वर्षे काम केले आहे, मला मुंबई पोलिसांची क्षमता माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांचा उल्लेख भांडी घासणार्यांशी केला होता, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला तरुंगात टाकले. पत्रकारांनी सरकारच्या विरोधात बोलू नये, अशी महाविकास आघाडी सरकारची भूमिका आहे. 'सामना'मधून पंतप्रधान आणि राज्यपालांबद्दल काहीही बोलले जाते, त्यासाठी सत्ताधाऱ्यांनी काय ती एक भूमिका ठेवावी. पंतप्रधान, राज्यपाल इतर नेत्यांना काही किंमत नाही का? हे दुटप्पी धोरण ठेवू नका, असे फडणवीस म्हणाले.
हेही वाचा - नागपूर: शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा लाईन अद्याप नादुरुस्त, रुग्णांना मेयोत हलवले
'आरे मेट्रो डेपो'चे काम पूर्ण झाले असताना आता स्थगितीचा आत्मघातकी निर्णय का घेतला? पहाडी-गोरेगाव येथे डेपो स्थलांतर करणे योग्य नाही. झालेले नुकसान कोण भरून देणार? नव्याने जागा खरेदी करावी लागेल. आरे प्रकरणी सरकारने पुनर्विचार करून त्या ठिकाणी मेट्रो कारशेड कायम ठेवून तातडीने काम सुरू करावे, अशी विनंती फडणवीस यांनी केली.
फडणवीस यांच्या भाषणातील मुद्दे:
* काल ठरले की, सर्व विषयांवर चर्चा करायची आणि आज तीन वाजता मतदान आहे, हे गृहित धरून त्याच्याआधीचा वेळ गोंधळात कसा घालवायचा, याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला. राज्य सरकार गंभीर नाही, हाच याचा अर्थ
* 24 मार्च रोजी गेल्या अधिवेशनाचा निरोप घेतला, तेव्हा रुग्णसंख्या 28 होती आणि आज 9.25 लाख
* सर्वाधिक पोलीस प्रभावित झाले, आरोग्य कर्मचार्यांना संसर्ग होण्याचे प्रमाणसुद्धा महाराष्ट्रात अधिक
* देशातील एकूण मृत्यूंपैकी 38 टक्के मृत्यू महाराष्ट्रात.
* कोरोनामध्ये महाराष्ट्रात मृत्यूचे थैमान चालू आहे
* अनेक शहरांमध्ये अतिशय भयावह स्थिती
* महाराष्ट्र अनेक क्षेत्रात नंबर 1. पण, तो कोरोनात नंबर 1 होऊ नये, अशी आमची अपेक्षा होती
* आम्ही कोरोनाची स्थिती काहीही दाखवत असू. पण चित्र वेगळे आहे.
* मुंबईत आपण 7500 मृत्यू दाखवितो आहोत. पण, प्रत्यक्षात 15 हजार मृत्यू झाले आहेत.
* आपण संख्येशी लढतो आहोत, कोरोनाशी नाही
* घोषणा आणि जीआरमध्ये फरक
* राज्यात केवळ 9000 लोकांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ.
* गरिबाला कुठलीही मदत नाही, त्याच्यावर मरणाची वेळ. 20-20 लाख रुपये बिलं लादली जात आहेत
* आठ-आठ दिवस टॉयलेटमध्ये पेशंट मरून पडले आहेत. कुणाला कळत नाही, हे किती गंभीर आहे.
* ज्याच्या खिशात पैसे नाही, त्याला मरणासाठी सोडून देण्यात आले आहे.
* बेड प्रचंड आहेत, असे सांगितले जाते. पण, तेथे कोणतीही व्यवस्था नाही.
* मरणाशिवाय या सरकारने कोणताही पर्याय ठेवला नाही
* मालेगावात यावर्षी झालेले मृत्यू आणि गेल्यावर्षीचे मृत्यू यात तिपटीचा फरक.
* संख्या कमी करण्यासाठी सर्वांत मोठा प्रयत्न काय तर चाचण्या कमी करून टाकल्या
* मुंबईत चाचण्या कमी का?.
* लपवून काय साध्य होणार
* महाराष्ट्रात सातत्याने 20 टक्के संसर्ग दर.. देशापेक्षा आणि अन्य राज्यांपेक्षा तो कितीतरी अधिक.
* काल तर 25 टक्के संसर्गाचा दर. स्थिती भयावह आहे
* जम्बो कोविड सेंटर आरोग्यासाठी की कुणालातरी लाभ देण्यासाठी?
* बीकेसीतील कोविड सेंटरमध्ये चाललं काय?
* 37 टक्के मृत्यूदर तेथे आहे. असा दर जगात कुठेही नाही.
* याही स्थितीत भ्रष्टाचार हा प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार आहे.
* माझी सरकारला विनंती आहे, हे वागणं योग्य नाही
* कोविड सेंटर हे मरणाचे आगार करू नका.
* मुंबई, पुणे महत्त्वाचे आहेच, पण औरंगाबाद, नाशिक, नागपूर हे महाराष्ट्रातच आहेत, हे सरकारला सांगावे लागेल काय?
* दुसर्या कोणत्याही शहरांना कोणतीही मदत का नाही?
* मजुरांसंदर्भात काय-काय केले, त्याचे उत्तर अजूनही सर्वोच्च न्यायालयाला राज्य सरकार देऊ शकलेले नाही.
* मुख्यमंत्री निधीत पैसे दिले नाही, म्हणून टीका केली. पण, आज तेथील निधी खर्च करीत नाहीत. पंतप्रधान निधीतून सर्वाधिक मदत महाराष्ट्राला मिळाली
* बांधावर जाऊन खतं देऊ, असं सांगितलं. पण, प्रत्यक्षात बियाण्यांचा काळाबाजार करून बोगस बियाणं दिलं गेलं.
* अनेक ठिकाणी 3 वर्ष जुने बियाणं. त्यामुळे खोडकिडीचा प्रादुर्भाव. चांगला मान्सून येऊनही शेतकर्यांचे प्रचंड नुकसान
* वीजबिले प्रचंड आली आहेत. सामान्य माणूस सांगतो म्हणून ऐकायचे नसेल तर किमान सेलिब्रिटी सांगतात म्हणून तर कमी करा.
*विदर्भात पुराने मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी कोणती दखल घेतली असेल तर दाखवा.
* मी स्वतः जाऊन आलो, अतिशय भीषण अवस्था आहे. दिले किती तर १६ कोटी रुपये!
* दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यांच्यासाठी कोणते निर्णय होत नाहीत.
* सरकारची अर्थव्यवस्था चांगली नसेल तर, काही खर्च टाळता आले असते.
* छोटी-छोटी राज्ये निर्णय घेतात अन् महाराष्ट्रात एकही निर्णय होत नाहीत.
* बारा बलुतेदारांपैकी एकाही घटकासाठी निर्णय नाही
* सरकारचा दिशा कायदा मंत्रिमंडळ बैठकीत कसा फिरला, हे आम्हाला ठाऊक आहे.
* आज कोविड सेंटरमध्ये महिला सुरक्षित नाहीत
* आजही मुंबई पोलिसांचा आम्ही सन्मान करतो.
* पण पोलीस भांडी धुण्याच्या कामाचे हे मुख्यमंत्री का बोलले?
* आज माध्यमांच्या उल्लेखाबाबत बोलले जाते. पण ‘सामना‘ बाबत तीच भूमिका घ्याल का?
* पंतप्रधानाचा उल्लेख तेथे कसा केला जातो, हे सांगावे लागेल का?
* मेट्रोचे काम बंद ठेवले तर दिवसाला ५ कोटी नुकसान.