मुंबई - केंद्र सरकारने अनलाॅक 1 आणि कंटेन्मेंट झोनमध्ये लाॅकडाऊन 5 लागू केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कंटेन्मेंट झोन वगळता इतरत्र नियमांमध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे. मुंबईतील सरकारी कार्यालये व खासगी कार्यालयांमध्ये 10 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीला अनुमती दिली आहे. त्यानुसार मुंबईतील काही कार्यलयांचे कामकाज सुरू झाले आहे. त्यामुळे सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर कर्मचारी आणि वकिलांची गर्दी पाहायला मिळाली.
कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे मुंबईतील सत्र व उच्च न्यायालयात केवळ महत्त्वाच्या याचिकांवर सुनावणी घेण्यात येत आहे. राज्यात अद्याप लॉकडाऊन सुरू असल्यामुळे याचिकांच्या सुनावणीसाठी न्यायालयात संबंधित नागरिक येत आहेत. मात्र, न्यायालयीन प्रशासनाकडून खटल्याच्या सुनावणीबद्दल योग्य ती माहिती मिळत नसल्याची तक्रार काही याचिकाकर्त्यांनी केली आहे.
मुंबईतील महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती सुद्धा वाढविण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फिजिकल डिस्टन्स पाळत कर्मचाऱ्यांसाठी वाहतूक व्यवस्था बँकेकडून करून देण्यात आली आहे. लवकरच बँकेतील कर्मचाऱ्यांची संख्या टप्प्याटप्याने वाढविण्यात येणार आहे.
हेही वाचा- पोहायला गेलेल्या 12 वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू; पोंभुर्णा येथील घटना