मुंबई-सिंधुदुर्गवासीयांचे स्वप्न असलेले चिपी विमानतळाचे उद्घाटन मंगळवारी ५ मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री (ग्रामीण) तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध लोकोपयोगी योजना व उपक्रमांचे भूमीपूजन व लोकार्पण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत शकेसकर म्हणाले, की गेल्या साडेचार वर्षात चिपी विमानतळाच्या कामास गती दिली आहे. त्यामुळे आता विमानतळासाठीच्या सर्व परवाने मिळाले आहेत. पुढील आठ ते पंधरा दिवसात या विमानतळावरून प्रत्यक्ष विमानाचे उड्डाण होणार आहे. यामुळे सिंधुदुर्गमधील पर्यटन उद्योग वाढीस फायदा होणार आहे.विमानतळाच्या उद्घाटनाबरोबरच चांदा ते बांदा योजनेतील बहुप्रजातीय मत्स्यबीज निर्मिती केंद्र, आनंदवाडी प्रकल्पांचे भूमीपूजन, सिंधुदुर्गमधील सीसीटीव्ही प्रकल्प, देवगडमधील पवन ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण, कृषी यांत्रिकीकरण, एस.आर.ए, पशुसंवर्धन व पिंजरा शेती प्रकल्पातील लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप, पोलिसांना स्वतःच्या घरासाठी गृह कर्जाचे वितरण आदी कार्यक्रमही होणार आहेत. तसेच आयुष्यमान भारत, श्रमयोगी योजनेचा शुभारंभही होणार आहे. यावेळी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण व भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्यात सामंजस्य करार होणार आहे, असे केसरकर यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग येथे मत्स्य व्यवसाय व हॉर्टिकल्चर कार्गो हब सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्याबरोबर सिंधुदुर्गमधील पर्यटन वाढावे, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास पाणबुडी घेण्यासाठी 65 कोटींचा निधी देण्यात आला आहे. भारतातील पहिली पाणबुडी पर्यटकांसाठी येत्या काही दिवसात सिंधुदुर्गमध्ये येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.